ताज्या बातम्याधार्मिकमहत्वाचेमहाराष्ट्र

अहमदाबादेतील 146 वी रथयात्रा उत्साहात


येथील 146 वी रथयात्रा  मंगळवारी उत्साहात पार पडली. 18 किमी लांबीच्या या रथयात्रेसाठी चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लाखो भाविकांनी देवतांचे दर्शन घेण्यासाठी या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या संपूर्ण मार्गावर नजर ठेवण्यासाठी गुजरात पोलिसांनी प्रथमच रथयात्रेसाठी थ्री-डी मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. या कार्यक्रमादरम्यान कुणीही बेकायदेशीररीत्या ड्रोनचा वापर करू नये, यासाठी पोलिसांनी अँटी-ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सकाळी सोन्याचा झाडू वापरून (Rath Yatra) रथाचा मार्ग स्वच्छ करण्याचा प्रतीकात्मक ‘पहिंद विधी’ केला, त्यानंतर येथील जमालपूर परिसरातील 400 वर्षे जुन्या मंदिरातून भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या रथयात्रेला सुरुवात झाली.

हा वार्षिक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सकाळी मंगलआरती केली. या रथयात्रेत जवळपास 15 सुशोभित हत्ती, चित्ररथ आणि गायन करणारी पथके असलेले 100 ट्रक्स सहभागी झाले होते. हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ महिन्यातील दुसर्‍या दिवशी म्हणजे आषाढी बीजला दरवर्षी ही रथयात्रा काढली जाते. सकाळी मंदिरातून सुरू झालेली ही  रथयात्रा जुने शहर तसेच जमालपूर, कालुपूर, शाहपूर आणि दरियापूर या भागातून मार्गक्रमण करीत रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास परतली. कोणताही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहर पोलिस, होमगार्ड, राज्य राखीव पोलिस आणि निमलष्करी दलाते 26 हजारांपेक्षा जास्त जवान 18 किमी लांबीच्या यात्रा मार्गावर मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *