ठाणेताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

कुवत, मर्यादा ओळखून बोला! एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले


ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरात देशाचा गौरव होत आहे. त्यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. देशातील आणि राज्यातील जनता याचे उत्तर तुम्हाला लवकरच देईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावले.

आपली कुवत आणि मर्यादा ओळखून बोला, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विधान परिषदेतील आमदार मनीषा कायंदे यांच्यासह काही नगरसेवकांनी रविवारी रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यात पंतप्रधानांवर केलेल्या टीकेला शिंदे यांनी उत्तर दिले. ‘शिवसेनेचा वर्धापन दिन उद्या असतो. मात्र नवा दिवस शोधून काढत आजच भाषणातून तीच-तीच कॅसेट पुन्हा वाजवली. या बोलण्याची आता लोकांनाही सवय झाली आहे. मात्र बोलताना स्वत:ची कुवत आणि मर्यादा ओळखून बोलायला हवे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसोबत आणि शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न ज्यांनी साकार केले त्यांच्यासोबत आहोत. ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेसाठी लाचारी केली. काम झाले की फेका ही तुमची वृत्ती आहे’, अशी टीकाही शिंदे यांनी केली. जे गेले ते कचरा होता असे म्हणता, पण कचऱ्यापासून उर्जा निर्मीती तर होतेच. शेतकरी खत निर्मीती देखील करतो. कचरा आता टाकावू राहीलेला नाही, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना लक्ष्य केले.

जंगलाचा राजा वाघच असतो. काहींना रोज कोल्हेकुई करायची सवय जडली आहे. वाघ अशांकडे दुर्लक्ष करतो. पंतप्रधानदेखील तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ज्यादिवशी त्यांची नजर तुमच्यावर पडेल तेव्हा तुम्ही दिसणारदेखील नाहीत. 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *