चीनच्या रुग्णालयातील फोटो आणि व्हिडीओ पाहून चीनमध्ये कोरोनाचा कहर झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमधील सर्वच रुग्णालये तुडूंब भरली आहेत. मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाहीये, त्यामुळे मृतदेहांना जमिनीवर ठेवण्यात आले आहे. सगळीकडे मृतदेहांची रास दिसत असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या दृश्यामुळे चीनच नव्हे तर अख्ख जग हादरून गेलं आहे.
बीजिंग : सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे.कोविड-19 संसर्गामुळे इथे आरोग्य सेवा कोलमडू लागल्या आहेत. दरम्यान, लंडनस्थित ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्स फर्मने एक भीतीदायक आकडेवारी सादर केली आहे. या फर्मच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये अत्यंत कमी लसीकरण आणि बूस्टर डोस तसंच हायब्रिड प्रतिकारशक्तीचा अभाव पाहता, बीजिंगने आपली झिरो-कोविड पॉलिसी हटविल्यास 13 ते 21 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. एअरफिनिटीच्या विश्लेषणानुसार, ‘चीनच्या लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्तीची पातळी खूपच कमी आहे.
तेथील नागरिकांना चीनमध्ये बनवलेल्या लसी, सिनोव्हॅक आणि सिनोफार्म देण्यात आल्या, ज्या अतिशय कमी प्रभावी ठरल्या आहेत. या लसी कोरोना संसर्ग आणि मृत्यूपासून फारच कमी संरक्षण देतात. कंपनीने असंही म्हटलं आहे की चीनच्या झिरो-कोविड पॉलिसीचा अर्थ असा आहे की त्यांच्या मोठ्या लोकसंख्येने आधीच्या संसर्गादरम्यान नैसर्गिक प्रतिकारशक्ती प्राप्त केलेली नाही. यासोबतच कंपनीने म्हटलं की ‘या घटकांच्या परिणामी आमचे विश्लेषण असे दर्शविते की, जर मेनलँड चीनला फेब्रुवारीमध्ये हाँगकाँगसारखी लाट दिसली तर त्यांची आरोग्य यंत्रणा कोलमडून जाईल.
कारण देशभरातील 17 ते 28 करोड लोकांना संसर्ग होईल. त्यामुळे 13 ते 21 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
एअरफिनिटी येथील लस आणि महामारीविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. लुईस ब्लेअर म्हणाले की, चीनने आपल्या शून्य-कोविड धोरणातून बाहेर पडण्याआधी प्रथम प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी लसीकरण वाढवणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, ‘त्यानंतर, चीनला भविष्यातील लाटा कमीत कमी प्रभावाने रोखण्यासाठी संकरित प्रतिकारशक्ती निर्माण करावी लागेल.’ भारतही झालं सावध – जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे भारत सरकार अलर्ट झालं आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून नवीन प्रकरणांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मोठी बैठक बोलावली आहे. आज सकाळी 11.30 वाजता होणाऱ्या या बैठकीत आरोग्यमंत्री देशातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती आणि तयारी याबाबत आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. चाचणी-निरीक्षण-उपचार-लसीकरण आणि कोविड-योग्य वर्तनाचे पालन केल्याने, भारत कोरोनाव्हायरसचा प्रसार मर्यादित करू शकला आहे. सध्या देशात आठवड्यात संसर्गाची सुमारे 1,200 प्रकरणे नोंदवली जात आहेत.