युट्यूबर तरुणीची छेडछाड करतानाचा लाईव्ह व्हिडीओ व्हायरल

 

मुंबई : मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन करू शकणारी घटना घडली आहे. एका कोरियन युट्यूबर तरुणीची छेडछाड करतानाचा लाईव्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन तरुणांनी तिचा हात पकडून तिला बळजबरीने ओढून नेत असल्याचा आणि तिचा पाठलाग करत असल्याचा हा व्हिडीओ आहे.

यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

दक्षिण कोरियाची युट्यूबर महिला रात्रीच्या वर्दळीच्या वेळी मुंबईत फिरत होती. खार भागात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना होती. पोलिसांनी याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही, परंतू या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे म्हटले आहे. ही महिला लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
दोन तरुणांपैकी एकजण तिच्या खूप जवळ आला आणि तिने विरोध करूनही तो तिच्या हाताला पकडून स्कूटरवर बसविण्यासाठी ओढत होता. तसेच ती आली नाही म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला किस करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी तिने नो, नो असे म्हणत त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला. यावरच हे तरुण थांबले नाहीत तर ती पुढे जात असताना पुन्हा मागून स्कूटर घेऊन आले आणि तिला आम्ही सोडतो, आमच्यासोबत बस असे सांगू लागले. यावेळी तिने माझे घर इथेच समोर आले असे सांगितले, तरी देखील हे तरुण तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हते.
पोलिसांनी तक्रार आलेली नसली तरी चौकशी सुरु केली आहे. व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रकरणी दोघांनाही खार पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबीन शेख(19) आणि मोहम्मद अन्सारी (20) अशी दोन्ही अटक आरोपींची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here