बीड : बायपास व बीड शहरा कडे जाणार्या चौकात मोटार सायकलीला एका टेम्पोने धडक देऊन झालेल्या अपघातात कालिदास विठ्ठल जाधव रा शेलगाव गांजी ता केज आणि त्यांच्या सोबत एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या बांधकाम कामगारांना चिरडले. या भीषण अपघातात (Accident) बांधकाम मिस्त्रीसह एक कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघाताची घटना (Beed) बीड- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात दुपारी तीनच्या सुमारास घडली.
सदर अपघातात अनिता भारत सरपते (वय 41, रा. गोविंदनगर, बीड) व कालिदास विठ्ठल जाधव (वय 38, रा. शेलगाव गांजी ता. केज) अशी मयतांची (Accident Death) नावे आहेत. अनिता सरपते या बिगारी काम करत होत्या, तर कालिदास जाधव हे बांधकाम मिस्त्री होते. ते दोघे बांधकामावर कामासाठी दुचाकीवरून मांजरसुंबाकडे जात होते. यादरम्यान गेवराईकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील टेम्पोने त्यांना चिरडले.
दरम्यान, अनिता सरपते यांचा मृतदेह टेम्पोखाली अडकला होता. अखेर क्रेनच्या सहाय्याने तो बाहेर काढला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. दरम्यान अपघातानंतर अनिता सरपते यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.