धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून

सांगली : शहरातील कर्नाळ रोड परिसरात राहण्यास असलेल्या महाविद्यालयीन युवकाचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला.
अजित बाबुराव अंगडगिरी (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. तिघांनी पूर्ववैमनस्यातून त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास म्हसोबा मंदिर ते माधवनगर रोडवर ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत अजित हा कर्नाळ रोडवरील एका हॉटेलजवळ कुटूंबियांसह राहण्यास होता. याच ठिकाणी त्याच्या वडीलांची पानपट्टी आहे. तर अजित हा सांगली शहरातील एका महाविद्यालयात कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याला फोटोग्राफीची आवड होती.

अंगडगिरी कुटूंबियाने पदमाळे फाटा येथील म्हसोबा मंदिर ते माधवनगर रोडवर असलेले एक शेत कसण्यास घेतले आहे. बुधवारी दुपारी मयत अजित त्याची आजी व इतर महिलांसह शेतात मशागतीचे काम करत होता. याचवेळी तिघे संशयित तिथे आले व त्यांनी अजितला रस्त्यावर बोलवून घेतले. यावेळी तिघातील एका संशयिताने धारदार शस्त्राने अजितच्या छातीवर वार केला. एकच वार वर्मी लागल्याने तो तिथेच खाली कोसळला. यानंतर तिघेही संशयित तिथून पसार झाले. त्यानंतर त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here