नवरात्राची घटस्थापना महिषासुराला ठार मारून सृष्टीचं रक्षण करणाऱ्या देवीचा उत्सव

अश्विन महिन्यातील प्रतिपदेला देवीच्या नवरात्राची घटस्थापना होते. या काळात उपवास, पूजा, पारायण या गोष्टी करून भाविक देवीची भक्ती करतात.

महिषासुराला ठार मारून सृष्टीचं रक्षण करणाऱ्या देवीचा हा उत्सव असतो. देवीला तेजाची मूर्ती मानलं जातं. ज्योत, ऊर्जा, तेज ही अंधाराला नष्ट करणाऱ्या प्रकाशाची रूपं आहेत. त्यामुळे नवरात्रामध्ये घट स्थापन करून त्याजवळ अखंड तेवणारा दीप ठेवला जातो.

नऊ दिवस, नऊ रात्री त्या दिव्याची ज्योत मालवणार नाही याची काळजी घेतली जाते. यंदाच्या नवरात्रात अखंड दीप लावण्याआधी त्या विषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याआधी दिवा लावण्याची परंपरा आहे. त्यामुळेच जाहीर कार्यक्रमापूर्वी दीप-प्रज्ज्वलन करतात.

दिवा हा सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक समजला जातो. त्यामुळेच नवरात्रात 9 दिवस अखंड दिवा लावला जातो. देव्हाऱ्यात दिवा लावताना तेलाचा दिवा व तुपाचा दिवा लावण्याबाबत वेगवेगळे नियम आहेत. तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूस व तुपाचा दिवा उजव्या बाजूला लावण्याची प्रथा आहे.

तसं करणं शुभ समजलं जातं. दिवा लावताना ‘दीपं घृत दक्षे, तेल युतःच वामतः’ हा मंत्र म्हणावा. या मंत्रोच्चारामुळे दिवा लावण्याचं महत्त्व व मिळणारं फळ वाढतं, असं समजतात. नवरात्रात देवघरात अखंड दीप प्रज्ज्वलित करताना घरातील वातावरणही सात्विक राहील याची दक्षता घेतली पाहिजे. देवीची उपासना करताना मांसाहार वर्ज्य करावा.

मद्यपानही करू नये. घरात कोणतीही अपवित्र गोष्ट ठेवू नये. ब्रह्मचर्याचं पालन करावं. नवरात्रातील अखंड दिवा मालवला तर ते अशुभ समजलं जातं.

दिव्याची ज्योत हवेनं मालवू नये यासाठी काचेचं झाकण दिव्यावर ठेवू शकता. काही कारणानं दिवा मालवला, तर देव्हाऱ्यातील दुसऱ्या दिव्यानं त्याला पुन्हा प्रज्ज्वलित करावं. अखंड तेवणारा दिवा हे देवीचं रूप असतं. अनेक घरांमध्ये दिव्यालाच घट समजून त्याची स्थापना केली जाते.

त्यामुळे या काळात घर बंद करून जाऊ नये, असं मानतात. तसंच दिवा ठेवण्याची जागा स्वच्छ व टापटिप असावी. घरातील शौचालय, बाथरूमजवळ घट स्थापन करू नये. यंदा 26 सप्टेंबरपासून नवरात्राला सुरुवात होत आहे. घटस्थापनेपासून 9 दिवस देवीची आराधना केली जाते. देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. म्हणूनच अखंड तेवणाऱ्या ज्योतीला नवरात्रात विशेष महत्त्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here