आष्टीताज्या बातम्याबीड जिल्हा

अँक्सिलेटरवर नियंत्रण हाच इंधन बचतीवरील योग्य पर्याय – राजेंद्र लाड

अँक्सिलेटरवर नियंत्रण हाच इंधन बचतीवरील योग्य पर्याय – राजेंद्र लाड

चालक, वाहक व मँकेनिकल हीच खरी त्रिसुत्री – संतोष डोके

आष्टी :  ( गोरख मोरे ) बीड जिल्ह्यातील आष्टी आगारात सक्षम २०२२ – इंधन बचत मासिक कार्यक्रम २०२२ अंतर्गत इंधन बचत बाबतीत बसचालकांना इंधन बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी सोमवार दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीस इंधन बचत मासिक कार्यक्रमाच्या फलकाचे अनावरण प्रमुख वक्ते राजेंद्र लाड यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी विभागीय स्थापत्य अभियंता अविनाश मंजुळे, आष्टी आगाराचे कर्तव्यदक्ष व्यवस्थापक संतोष डोके यांची उपस्थिती होती. तद्नंतर शरद खोत यांनी इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन इंधन बचत बाबत माहिती दिली.
बीड जिल्ह्यातील आष्टी एस. टी. आगारात सोमवार दि. ११ एप्रिल २०२२ पासून इंधन बचत मासिक कार्यक्रम राबविला जात असून या निमित्ताने आष्टी येथील आगारात सक्षम २०२२ उद्घाटन कार्यक्रमात बस चालकांना इंधन बचतीचे महत्व सांगून इंधनाची बचत कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांनी केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी आगारप्रमुख संतोष डोके तर प्रमुख अतिथी म्हणून अविनाश मंजुळे हे उपस्थित होते.
इधन ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने इंधन बचत केली पाहिजे. केवळ एस. टी. प्रशासनापुरती इंधन बचतीचे कार्यक्रम न घेता राष्ट्रीय संपत्ती वाचविण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे असे राजेंद्र लाड यांनी बस चालकांना इंधन बचती विषयी मार्गदर्शन करतांना सांगितले. तसेच इंधन बचतीसाठी सिम्युलेटर मार्ग अवलंबावा. वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी अँक्सिलेटरचा वापर कमीत कमी करावा. वेळेवर बस बंद करुन टायरमधील हवा वेळेवर चेक करावी यामुळे इंधन बचत होईल. गाडीचा वेग कमी – जास्त न करता एकसारखा वेग ठेवावा. यासाठी सर्वांनी इंधन नसेल तर काय होईल याचा मनापासून विचार करावा. यामुळे काळाची पावले ओळखून आजपासून इंधन बचत केली तर मानवता अधोगती ऐवजी प्रगतीकडे जाईल. यासाठी लवकरच सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक ऊर्जा, सीएनजी गँस आदीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करावा लागणार आहे. भविष्यात इंधनाची मोठी टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे जेवढी बचत करणे शक्य होईल तेवढी इंधनाची बचत करावी. इंधन बचत करणाऱ्या चालकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर नवीन चालकानींही इंधनाची बचत करावी असे शेवटी राजेंद्र लाड हे म्हणाले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना आगार व्ववस्थापक संतोष डोके यांनी सांगितले की, चालक, वाहक व मँकेनिकल अशी त्रिसुत्री झाल्यास इंधन बचत नक्कीच होवून आपल्या आगाराचे मोठे नाव होईल. इंधन बचत करणे हे प्रामुख्याने चालकाच्या हातात असून चालकाने गाडीवर नियंत्रण ठेवल्यास निश्चितच इंधन बचत होण्यास चालना मिळेल. त्याचप्रमाणे चालकांनी एकमेकांशी समन्वय साधत इंधन बचतीसाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे असल्याने यामुळे एस. टी. ची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. यासाठी सर्वांनी इंधन बचत करुन सहकार्य करावे असे आवाहन संतोष डोळे यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते, प्रमुख अतिथी, कार्यक्रमाचे अध्यक्ष व चालक, वाहक, तसेच उपस्थित कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार हनुमंत नांगरे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास चालक, वाहक, मँकेनिकल, कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button