विडा धुळवडीच्या निमित्ताने गाढवावर बसून गावभर मिरवणूक

बिड : विडा गावातील ग्रामस्थांनी यंदा मोठ्या उत्साहातमध्ये पार पाडली. मागील काही वर्षापासून विडा गावांमध्ये जावयाचा शोध घेऊन जावयाची गाढवावरून वरात काढण्याची वेगळी प्रथा आहे. या उत्सवामध्ये विडा गावातील तरुण मोठ्या संख्येनं सहभागी होतात. यंदाही हा उत्साह दिसून आला.

मागील काही दिवसांपासून जावयाचा शोध विडा गावातील तरुण घेत होते. मागील दोन वर्षापासून खंडीत झालेली परंपरा यावर्षी करायची, असा चंगच जणू विड्याच्या तरुणांनी बांधला होता. अखेर काल रात्री अमृत देशमुख या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढायची निश्चित झालं. त्यांना गावांमध्ये आणण्यात आलं. मानपान करण्यात आला आणि आज सकाळी उठल्यानंतर त्यांना गाढवावर बसून त्यांची गावभर मिरवणूक काढण्यात आली.

खरं तर लग्न झाल्यानंतर नवरदेवाची घोड्यावरून मिरवणूक काढण्याची परंपरा असते. मात्र गावामध्ये होळी धुळवडीच्या निमित्तानं जावयाला गाढवावर बसून गावभर मिरवण्याची अनोखी परंपरा आहे. डीजेच्या तालावर रंगाची उधळण करत गावातील शेकडो तरुण या उत्साहात सहभागी झाले होते.

दरम्यान गेल्या ९० वर्षांपासूनची विडेकरांची ही अखंडित परंपरा असून, दरवर्षी वेगवेगळ्या जावयांना हा मान दिला जातो. विशेष म्हणजे होळी आणि धुलीवंदन आलं की गावातील जावई आणि इतर ठिकाणी राहणारे जावई देखील गायब होतात. मात्र त्यापैकी एका जावयाला शोधून आणत अखेर त्यांची गाढवावर बसून मिरवणूक काढली जाते. यामुळेच विडा गावची ही अनोखी परंपरा राज्यात चर्चेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here