हर हर महादेव !वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी रीघ ,धनंजय मुंडेंचे प्रभू वैद्यनाथास साकडे

परळी : हर हर महादेवचा जयघोष करीत भाविकांनी देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे महाशिवरात्रीनिमित्त दर्शन रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून सुरू झाले आहे.

श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी रात्री नऊ वाजेपासून मंदिराच्या पायऱ्यावर भक्त थांबलेले होते.

रात्री 12 नंतर मंदिरात भाविकांनी प्रवेश करत महाशिवरात्रीचे दर्शन घेणे सुरू केले. सोमवारी रात्री नऊ वाजता छबिना भजन व आरती झाली .त्यानंतर रात्री बाराच्या नंतर महाशिवरात्रीचे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेणे सुरू झाले. प्रारंभी मंदिर पुजारी यांनी श्री वैजनाथाची पूजा केली त्यानंतर दर्शन सुरू झाले. महाशिवरात्री निमित्त मंदिरात सनई चौघडाची सुविधा करण्यात आली. तसेच वैजनाथ मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, वैद्यनाथ मंदिरात सुरक्षेच्यादृष्टीने कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीड येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाने रात्री मंदिर परिसराची तपासणी केली यावेळी सोबत मार्शल डॉग होता.

वैजनाथ देवस्थान ट्रस्टची जोरदार तयारी
महाशिवरात्र उत्सवाची श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टने जोरदार तयारी केली आहे. महाशिवरात्रीत वैद्यनाथांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येणार असल्याने ट्रस्टच्यावतीने महिला, पुरुष व धर्मदर्शन अशा तीन रांगा लावण्यात येणार आहेत. भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून मंदिराच्या पायऱ्यावर बॅरिकेट उभारले आहेत. महाशिवरात्रीच्या कालावधीत पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.
भगवान शंकर व माता पार्वतीचे एकत्र निवास असलेले एकमेव ज्योतिर्लिंग
भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी केवळ परळीतच भगवान शंकर व माता पार्वतीचे एकत्र निवास असलेले एकमेव ज्योतिर्लिंग आहे. पुरातन काळात देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले. त्या मंथनातून चौदा रत्ने निघाली. त्यात वैद्यांचा राजा धन्वंतरी व अमृत ही दोन रत्ने होती. ही दोन रत्ने दानवांच्या हाती लागू नयेत म्हणून भगवान श्रीविष्णूने अमृतासह धन्वंतरीला परळीच्या ज्योतिर्लिंगात लपवून ठेवले. दानवांना हे समजताच ते अमृत घेण्यासाठी धावले, परंतु त्यांचा त्या शिवलिंगाला स्पर्श होताच त्यातून अग्नीच्या ज्वाळा निघाल्या. ते पाहून राक्षस पळून गेले. मात्र, शिवभक्तांनी जेव्हा या शिवलिंगाला स्पर्श केला. तेव्हा त्यातून अमृतधारा निघाल्या. तेव्हापासून या ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून भक्त दर्शन घेतात, अशी आख्यायिका आहे.

धनंजय मुंडेंचे प्रभू वैद्यनाथास साकडे

कोविड असेल किंवा अतिवृष्टी मागील दोन वर्षांच्या काळात सर्वसामान्य माणसाने अनेक संकटांना तोंड दिलेच पण अगदी देवळाची दारे सुद्धा बंद राहिली, देवळांची दारे पुन्हा बंद होतील, या स्वरूपाचे कोणतेही संकट आता राज्यावर येऊ नये, असे साकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथास घातले आहे.

आज महाशिवरात्री निमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सहकुटुंब प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मागील दोन वर्षांच्या काळात कोविड विषयक निबंधांमुळे सार्वजनिक यात्रा सारख्या कार्यक्रमांना बंदी होती, यावर्षी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे व पारंपरिक शिवरात्री उत्सव संपन्न होतो आहे. पुढील वर्षी नेहमी प्रमाणे भव्य यात्रा भरेल व या यात्रेच्या लौकिकाची सर्व माध्यमे स्वतःहून दखल घेतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

शिवभक्तांना फराळ वाटला
दरवर्षीप्रमाणे नगर परिषदेच्या वतीने दर्शन बारीत शिवभक्तांना फराळ वाटपाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन फराळ वाटप करताना दिसून आले. यावेळी यांच्यासह आ. संजय दौंड, अजय मुंडे,मुख्याधिकारी अरविंद मुंडे बाजीराव धर्माधिकारी, अभय मुंडे, नितीन कुलकर्णी, अनंत इंगळे, आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here