ताज्या बातम्या

कोळशाने भरलेला ट्रक उलटल्याने झोपडीत झोपलेल्या तीन लहान मुलींचा मृत्यू


भिवंडी : वीटभट्टीच्या बाजूला असलेल्या झोपडीवर कोळशाने भरलेला ट्रक उलटल्याने झोपडीत झोपलेल्या तीन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान टेंभीवली गावात घडली.या घटनेला जबाबदार धरीत वीटभट्टी मालक, ट्रकचालकासह चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा, मोहिली येथे राहणारा बाळाराम वळवी हे पत्नी व चार मुलींसह वीटभट्टी मजुरीसाठी तालुक्यातील टेंभीवली येथे गोपीनाथ मढवी व त्यांचा मुलगा महेंद्र मढवी यांच्या वीटभट्टीवर मजुरीसाठी गेले होते. वीटभट्टी परिसरातच गवताच्या झोपडीत हे मजूर कुटुंब राहत होते. झोपडी लगतच्या जागेत कोळसा साठविला जात असे. मंगळवारी संध्याकाळी हायड्रोलिक हायवा ट्रकमधून कोळसा आला होता. कोळसा ट्रकमधून खाली केला जात असताना ट्रकच्या मागील बाजूच्या ट्रॉलीचा कॉम्प्रेसर रॉड तुटला. त्यामुळे मागील ट्रॉली कोळशासह वीटभट्टी मजुराच्या झोपडीवर पडली. त्यात दबल्यामुळे वळवी यांच्या मुली लावण्या (वय ७), अमिषा ( ६), प्रीती (३) यांचा मृत्यू झाला. सुदैवाने बाहेर गेलेले बाळाराम व झोपडीबाहेर चुलीवर जेवण करणारी पत्नी व झोळीत झोपलेली दोन वर्षांची कीर्ती हे तिघे या अपघातातून बचावले आहेत.

चौघांवर गुन्हा, दोघांना अटक :

या दुर्घटनेनंतर भिवंडी तालुका पोलिसांनी वीटभट्टी मजुराच्या फिर्यादीवरून वीटभट्टीमालक गोपीनाथ मढवी, मुलगा महेंद्र मढवी, व्यवस्थापक सुरेश पाटील, ट्रकचालक तौफिक शेख या चौघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी गोपीनाथ मढवी व व्यवस्थापक पाटील यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *