कोल्हापूरमहत्वाचेमहाराष्ट्र

येत्या २७ तारखेला मोठा राजकीय भूकंप? फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदाराचा गौप्यस्फोट


राज्याच्या राजकारणात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आता कोल्हापूरचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा महाडिक यांनी केला आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपकडून तळागाळात जाऊन पक्ष मजबूत करण्याच्या सूचना खासदार आणि आमदारांना देण्यात आल्या आहे. या दरम्यान 27 जूनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

फडणवीसांच्या या दौऱ्यादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोट राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. महाडिक यांच्या या वक्ताव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 48 जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला महाराष्ट्रात संपूर्ण जागा देण्याचे आवाहन देखील जनतेला केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदार संघावार लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात उमेदवारी वाटप अद्याप निश्चित झाले नसले तरी किमान 45 जागा निवडून आणण्याचं लक्ष्य भाजपने समोर ठेवले आहे.

यासाठी आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरात दौरे करणार असून या दौऱ्यांदरम्यान राज्यभरात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार होईल यासाठी भाजपकडून तयारी सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा जागा कोणाला मिळणार? यावर अद्याप चर्चा झालेली नाही.यावेळी बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, राष्ट्रवादीने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपने आमचा योग्य सन्मान केला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल, त्यानुसार काम करणार आहोत. त्यामुळे आम्हाला लोकसभेच्या उमेदवारीबाबत कोणती आशा नाही. आम्हाला विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करायला सांगितलं तर करू, कारण आम्ही भाजपचे सैनिक आहोत. पक्ष जो आदेश देईल तो स्वीकारणार असे धनंजय महाडिक म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *