धार्मिकमहाराष्ट्र

माऊलींच्या पालखीचे उत्साहात स्वागत; ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’च्या घोषात वारकऱ्यांसह भाविक तल्लीन


भोसरी – मुखी ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’ नामाचा गजर… हाती भगव्या पताका… डोईवर तुळस वृंदावन… संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेताना ‘माऊली-माऊली’चा आसमंत व्यापणारा निनाद…दर्शनाने चेहऱ्यावर कृतार्थतेच्या भावनेने पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पुढे पडणारी पाऊले… अशा वातावरणात रांगोळीच्या पायघड्यात माऊलींच्या पालखीचे स्वागत मॅगझीन चौकात करण्यात आले.

जगतगुरू संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सकाळी सव्वाआठला वडमुखवाडीतील थोरल्या पादुका मंदिरात आगमन झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टद्वारे मंदिरात रांगोळीच्या पायघड्या, पुष्पसजावटीसह हरिनाम गजरात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी श्रींच्या पादुकांची आरती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांनी केले. श्रींचे पूजेचे पौरोहित्य अमोल गांधी यांनी केले.

या वेळी खासदार श्रीरंग बारणे, पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे, पालखी सोहळा मालक हभप बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, दिघी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, माजी महापौर नितीन काळजे, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, सुवर्णा बुर्डे, योगेश आरू, मनोहर भोसले, रमेश घोंगडे, रवींद्र गायकवाड, राजेंद्र नाणेकर, साहेबराव काशीद आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यातील पादुकांची पूजा करून पादुकांना पुष्पहार, तुळशीहार, श्रीफळ अर्पण करण्यात आला. श्रींची आरती हरिनाम गजरात झाली. श्रींना महानैवेद्य वाढविण्यात आला. पालखीचे सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान दिघीतील मॅगझीन चौकात आगमन झाले. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेद्वारे स्वागत केले. या वेळी महापालिकेच्या स्वागत कक्षात दिंडी प्रमुखांचे स्वागत आयुक्त सिंह, अतिरिक्त आयुक्त ज्ञानदेव जुंधारे, जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, इ क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, उपायुक्त रविकिरण घोडके, डॉ. शिवाजी ढगे आदींनी केले. या वेळी दिंडी प्रमुखांना महापालिकेद्वारे प्रथमोपचार कीट, शबनम पिशवी, श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

मॅगझीन चौकात पालखीच्या बैलजोड्यांना विश्रांती देण्यात आली. सकाळी दहाला पालखी दिघीकडे मार्गस्थ झाली. दिघीतील विठ्ठल मंदिराजवळ दिघीकरांनी पालखीचे स्वागत केले. सकाळी अकराला माऊलींच्या पालखीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
मॅगझीन चौकात सेल्फी पाइंट

मॅगझीन चौकात विठ्ठल-रुक्मिणी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमांची फुलांची आरास तयार करण्यात आली होती. भाविक या ठिकाणी सेल्फी घेण्याचा आनंद घेत होते.

महापालिकेची स्वच्छतेची दिंडी

पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे यावेळी स्वच्छतेची दिंडी काढण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या विविध वेशभूषेतील शंभर कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी नागरिकांना प्लास्टिक मुक्तीचा व झाडे लावण्याचा संदेश दिला. या वेळी प्लास्टिकचा राक्षसही उभा करण्यात आला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *