धोक्याचे नव्हे मोक्याचे
सावता परिषदेच्या स्थापनेला सोळा वर्षे पुर्ण झालीत. सोळावं वर्षे धोक्याचे असा अगोदरच्या वक्त्याने केलेल्या वक्तव्याचा धागा पकडून सोळावं वर्षे धोक्याचे नव्हे तर ते नविन उदयाचे व मोक्याचे ठरेल असा विश्वास देत सोळावं वर्षे धोक्याचं हि म्हण बदलून टाकू अशी मिश्कील टिप्पणी यावेळी बोलतांना जयंत पाटील यांनी केली. यावेळी मोठा हशा पिकला व टाळयांचाही कडकडाट झाला.
अहमदनगर : सावता परिषदेने केलेल्या मागण्या महत्वाच्या व रास्त असल्यामुळे या सर्व मागण्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणूक जाहिरनाम्यामध्ये समावेश केला जाईल असे आश्वासन देऊन बिहार सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ओबीसी जनगनणा केली पाहिजे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.
सावता परिषदेचे 5 वे त्रैवार्षिक अधिवेशन अहमदनगर येथे नुकतेच पार पडले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसी समाज मोठया संख्येने आहे आणि त्यात माळी समाज हा सर्वात मोठा घटक आहे. केंद्र सरकारमध्ये ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय व विशेष बजेट असावे हि सावता परिषदेची अपेक्षा देखील अतिशय रास्त आहे कारण प्रत्येक घटकांना आपला न्याय वाटा मिळालाच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने समाजातील सर्व घटकांना न्याय व संधी देणे माझी जबाबदारी आहे. ओबीसी हिताचा असणारा मंडल आयोग देशात सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आला. तेंव्हा राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार होते हे विसरता येणार नाही.
ओबीसीतील सर्व घटक जातींना सोबत घेऊन त्यांना न्याय देणे, त्यांच्यात जागृती निर्माण करणे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटीबध्द असल्याचे सांगताना माळी समाजासह सर्वच ओबीसीना संघटीत करुन एकसंघ करण्याचे काम कल्याण आखाडे यांनी हाती घ्यावे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीमध्ये स्थापनेपासून अनेक जेष्ठ नेत्यांचे मोठे योगदान आहे. यापुढे नविन पिढीला संधी निर्माण करुन देण्याची गरज आहे. अलिकडच्या काळात काही नविन चेहरे पक्ष कार्यात सक्रिय होत आहेत. त्यातील एक कल्याण आखाडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील उगवता तारा असून सक्षम नेतृत्व असल्याचा आवर्जून उल्लेख करुन तुमच्या मनात जे आहे तेच माझ्याही मनात आहे असे सांगून कल्याण आखाडे यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपविण्याचे त्यांनी सुतोवाच केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे तर माजी राज्यमंत्री आ. प्राजक्ता तनपुरे, आ. संग्राम जगताप, सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा संयोजक मयुर वैद्य, भगवान फुलसौंदर, अनिल झोडगे, कारभारी जावळे, विजय कोथिंबिरे, खंडू भुकन, किसन रासकर, बाळासाहेब बोराटे, शरद झोडगे, कैलास गाडीलकर, अमृता रसाळ आदींची मंचावर उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना कल्याण आखाडे म्हणाले की, सावता परिषद हि झेंडा व अजेंडा असणारी संघटना असून सहाव्या त्रैवार्षिक अधिवेशनापर्यंत आणखी सहा राज्यात कार्यविस्तार केला जाईल. सावता परिषदेच्या वतीने राज्यात माळी जोडो अभियान राबविण्यात येणार असुन माळी समाजाचे राजकिय जनजागरण करण्यासाठी राज्यातील शंभर विधानसभा मतदारसंघात जनजागरण मेळावे घेण्याचे त्यांनी जाहिर केले. तर प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य यांनी राज्यात सर्वत्र भक्कमपणे संघटना बांधणी करण्याची ग्वाही दिली. यावेळी सावता परिषदेचे प्रदेश महासचिव गणेश दळवी, मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरु, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव काळे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड. गोपाळ बुरबूरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मनिषा सोनमाळी तसेच भास्कर आंबेकर, शंकर बोरकर, छगन म्हेत्रे, लक्ष्मण ढवळे आदींची भाषणे झाली. आभार प्रदर्शन अहमदनगर जिल्हाध्यक्ष निखिल शेलार यांनी केले.
या अधिवेशनासाठी राज्यातील 27 जिल्हयामधून संघटनेचे प्रतिनिधी व समाज बांधवांची प्रचंड संख्येने उपस्थिती होती, यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
या अधिवेशनात प्रतिनिधी सत्रामध्ये संघटनात्मक व राजकिय स्वरुपाचे अनेक ठराव चर्चेसाठी ‘पटलावर ठेवून पारित करण्यात आले. यात प्रामुख्याने बिहारच्या धर्तिवर महाराष्ट्र सरकारने ओबीसी जनगनना करावी, श्रीक्षेत्र अरण विकास समितीची स्थापना करणे, महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे, केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय निर्माण करावे, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ओबीसी आरक्षण दयावे, ओबीसी महामंडळासाठी एक हजार कोटी रुपये तरतुद करावी, भिडेवाडयाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करावे, बाहयस्त्रोतामार्फत करण्यात येणाऱ्या नौकर भरती मध्ये आरक्षण लागू करावे, महात्मा फुले यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तातडीने वस्तीगृह सुरु करावेत, माळी समाजातील सर्व पोटजातींना एकसंघ करण्यासाठी माळी जोडो अभियान राबवीने. माळी समाज जन जागरणासाठी राज्यात शंभर मेळावे घेणे, महाराष्ट्रा बाहेर अन्य राज्यात संघटन विस्तार करणे. आदी ठराव पारित करण्यात आले.