“कुत्राही खाणार नाही हे अन्न” पोलीस कर्मचारी ढसाढसा रडला

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यात येत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
कडक भाकऱ्या अन् डाळीत पाणी… 12 तास काम केल्यावर असं अन्न मिळतं असं म्हणत पोलिसाने आपल्या व्यथा मांडल्या आहेत. तसेच “कुत्राही खाणार नाही हे अन्न” असं म्हणत तो ढसाढसा रडला. पोलीस कर्मचाऱ्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाविरोधात आपला आवाज उठवला आहे.

मनोज कुमार असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्याने अनेकदा जेवणाऱ्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रार केली होती. पण कोणीच त्याची दखल घेतली नाही. वरिष्ठांना फोनवरुनही संपर्क केला, पण काहीच फायदा झाला नाही. उलट निलंबन करण्याची धमकी दिली गेली असं देखील मनोज कुमार यांने म्हटलं आहे. आपली व्यथा मांडताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून येत आहे. तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या आहेत.

मेसमध्ये पोलिसांना जेवण दिलं जातं. पण 12 तास ड्युटी केल्यानंतर मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा किती खालावला आहे. पोलीस शिपायांना दिलं जाणारं हे जेवणं इतकं वाईट आहे, की कुत्राही त्यांना तोंड लावणार नाही, असं मनोज कुमार यांनी म्हटलं. “आमचं ऐकणारं कोणीच नाही या विभागात. साहेब जर तुम्ही आधी ऐकलं असतं तर माझ्यावर आता येथे येण्याची वेळच आली नसती. ताटातल्या पाच भाकऱ्या आणि लोणचं तुम्ही खा… म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचे कर्मचारी 12 तास काम केल्यावर कसं अन्न जेवतात” असं देखील मनोज कुमारने म्हटलं आहे.

पोलीस कर्मचारी जेव्हा आपली व्यथा मांडत होता. तेव्हा सिविल लाइन्स चौकीचे पोलीस आले आणि जबरदस्तीने त्याला जीपमधून घेऊन गेले. निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताच फिरोजाबाद पोलिसांनी सीओ यांनी फूड क्वालिटीचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या या घटनेची चर्चा सर्वत्र रंगली आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here