
इचलकरंजी : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून आज एका डॉक्टरचा बंगला भरदिवसा चोरट्यांनी फोडला. कपाटातील आणि मार्बल फरशीचे लॉकर तोडून तब्बल ७ लाख रुपयांची रोख रक्कम, ९ लाख रुपयांचे सोन्याचे, हिऱ्याचे दागिने असा सुमारे १६ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविलाही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची फिर्याद डॉ. व्ही. सत्यनारायण यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, शहरात पुन्हा एकदा भरवस्तीत भरदिवसा झालेल्या घरफोडीने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील आवाडे अपार्टमेंटच्या पाठीमागे जानकीनगर भागात डॉ. व्ही. सत्यनारायण यांचा सत्यविजय नावाचा बंगला आहे. आज सकाळी हे डॉक्टर दाम्पत्य कोल्हापूरला गेल्याने त्यांचा बंगला कुलूप बंद होता. आज दुपारी डॉक्टर दाम्पत्य परतले असता बंगल्याचा मुख्य लोखंडी आणि आतील दरवाजाचे कुलूप उचकटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी बंगल्यात पाहणी केली असता बेडरूममधील भिंतीतील कपाटे आणि मार्बलमध्ये बसवलेले लॉकरही तोडलेले आढळले. कपाटातील एका बॅगेत ठेवलेले ७ लाख रुपये आणि मार्बलमध्ये बसवलेल्या लॉकरमधील सुमारे ९ लाखाचे सोन्याचे,हिऱ्याचे दागिनेही चोरट्यांनी लंपास झाल्याचे उघडकीस आले.मात्र घरातील चांदीचे दागिने, लॅपटॉप यांसह अन्य किंमती वस्तुंना चोरट्यांनी हात लावला नाही.
चोरीसाठी वापरलेली कटावणी टाकून चोरटे पसार झाले आहेत. चोरीची माहिती समजताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पथकासह धाव घेतली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी भेट देऊन तपासाबाबत सुचना केल्या. तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
तोडलेल्या लॉकरसह पसार
कटावणीने चोरट्यांनी कपाट व मार्बल फरशीतील लॉकर कटावणीने तोडले. यातील रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारत लॉकरसह घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळ तपासात लॉकर आढळून न आल्याने चोरटे लॉकरसह पसार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
चोरटे अट्टल
घरफोडीची पद्धत पाहता चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. माहितीगार व्यक्तींशी संगनमत करून अट्टल चोरट्याने ही घरफोडी केल्याची शक्यता धरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.