शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुखाचा अपघाती मृत्यू

शिवसेनेचे माजी कराड तालुकाप्रमुख आणि घोगाव (ता. कराड) येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था व मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव भावके (वय 52) यांचे अपघाती निधन झाले. कराड-रत्नागिरी महामार्गावर घोगाव येथे मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घोगाव येथे श्री संतकृपा शिक्षण संस्थेसमोर कराड-रत्नागिरी महामार्गावर अशोकराव भावके यांचे मातोश्री हॉटेल आहे. या हॉटेलसमोर मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते महामार्गावर उभे होते. यावेळी महामार्गावरून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. हॉटेलमधील लोकांनी त्यांना उपचारासाठी मलकापूर (कराड) येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबतची माहिती जिल्हाभरात पसरली. त्यानंतर अनेक शिवसैनिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर अनेक शिवसैनिकांना शोक अनावर झाला. गुरुवारी (दि. 17) घोगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 1995 साली अशोक भावके यांनी शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र, या मतदारसंघात 1995 मध्ये पहिल्यांदाच अशोक भावके यांनी काँग्रेसच्या स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या विरोधात शिवसेनेतून लढत दिली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचा झंझावात निर्माण केला होता; परंतु त्यांना यश आले नाही. मात्र, या निवडणुकीनंतरच खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय वाटचालीस सुरुवात झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here