पंढरीला पायी निघालेल्या एका वारकऱ्याला वाचविण्याचा प्रयत्नात फॉर्च्युनर उलटून भीषण अपघात

नातेवाईकाच्या रक्षाविसर्जनासाठी जात असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीनजीक पंढरीला पायी निघालेल्या एका वारकऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करताना भरधाव फॉर्च्युनर उलटून झालेल्या भीषण अपघातात कसबे डिग्रज (त मिरज) येथील दाम्पत्य ठार झाले, तर अन्य पाचजण गंभीर जखमी झाले.

पृथ्वीराज दौलतराव चव्हाण (वय 55), प्रियांका पृथ्वीराज चव्हाण (वय 50) अशी मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. विलास महादेव माने (वय 50), अनिता विलास माने (वय 45, रा. सांगली), विवेक मुधाजीराव चव्हाण (वय 52), विजया विवेक चव्हाण (दोघे रा. चिकोडी, जि. बेळगाव) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

सांगली, चिकोडी व कसबे डिग्रज येथील नातेवाईक हे फॉर्च्युनर गाडीतून बीड येथील नातेवाईकाच्या रक्षाविसर्जनासाठी जात होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी गावात बसस्टॉपसमोर पंढरपूर रस्त्यावरून चालत निघालेल्या वारकऱ्याला वाचविताना भरधाव फॉर्च्युनर ताबा सुटून खडीच्या ढिगाऱ्यावर गेली. या ढिगाऱ्यात असलेल्या दगडावर आदळून तीन वेळा उलटली. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला.

या अपघातात कारमधील चौघे गंभीर जखमी झाले. जखमींना कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जखमींना सांगली येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविले आहे. अपघातात वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे नाव समजू शकले नाही. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

पहाटे गाडीचा आवाज झाल्यामुळे विठ्ठलवाडी येथील नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारांसाठी पाठविले. रामचंद्र बजबळकर, किसनराव टोणे, सह्याद्री बजबळकर, रवींद्र टोणे, अशोक शिंदे, अजय घेरडे आदींसह नागरिक मदतीसाठी प्रयत्न करीत होते. अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here