
विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी लग्नात हुंडा न दिल्याने माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार 19 जुलै 2021 ते 30 जुलै 2021 या कालावधीत प्रेमलोकपार्क, चिंचवड येथे घडला.
पती निलेश पांडुरंग चव्हाण (वय 33), सासू, दीर नितीन पांडुरंग चव्हाण (वय 39, सर्व रा. विठ्ठलवाडी, वडज, ता. जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने 10 फेब्रुवारी 2022 रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लग्न झाल्यानंतर त्या सासरी नांदत असताना आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या आई वडिलांनी लग्नामध्ये मानपान केला नाही. लग्नात हुंडा, दागिने दिले नाहीत म्हणून फिर्यादी यांना माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यासाठी फिर्यादीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी महिला माहेरी आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक दीक्षा झडते तपास करीत आहेत.