राजकीय

अपात्रता सुनावणीत उलटतपासणी,ठाकरे गटाचे दावे खा. शेवाळेंनी फेटाळले


नागपूर : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी आपला पक्ष आणि कायकर्ते यांना पणाला लावले, असा दावा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला.

शिंदेंना दिलेले मुख्य नेतेपदही बेकायदेशीर असल्याचा दावा केला. मात्र, हे दोन्ही दावे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी फेटाळून लावले.

नागपूर येथे शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या अपात्रता सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांकडून तिसरे साक्षीदार खासदार राहुल शेवाळे यांची उलटतपासणी घेण्यात आली. चार तासांच्या या सुनावणीत शिंदे गटाकडून शिवसेनेची घटना कागदपत्रांसोबत जोडण्यात आली. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. शिंदे गटाच्या वकिलांकडून २३ जून २०१८ रोजी झालेल्या शिवसेनेच्या प्रातिनिधिक सभेवरच बोट ठेवण्यात आले. ही सभाच झाली नसल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला. याच सभेत शिंदेंची शिवसेना नेतेपदी निवड झाली असल्याने ठाकरे गटाच्या वकिलांनीही याच दिशेने प्रश्न विचारत शेवाळे यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला.

मुख्य नेता पद दाखवा

शिंदेंच्या वकिलांकडून उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानुसारच ठाकरे गटाने शिंदे यांच्या मुख्य नेतापदावर प्रश्न उपस्थित केला.

१८ जुलै २०२२ रोजी शिंदे यांची मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली. हे पद घटनेत आहे का, असा सवाल कामत यांनी केला. यावर आहे, असे उत्तर शेवाळे यांनी दिले असता तुम्ही सादर केलेल्या घटनेत मुख्य नेतापद कुठे आहे ते दाखवा, असे वकिलांकडून सांगण्यात आले.

ठाकरे वेळ देत नव्हते

काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच्या सरकारबद्दल असंतोष असल्याने आम्ही सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती. यासाठी कार्यकारिणीची बैठक बोलविण्याची मागणी केली होती. सर्व शिवसेना आमदार, नेते, उपनेते, नगरसेवक, कार्यकर्ते हेसुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी आग्रही होते. पण, उद्धव ठाकरे हे यापैकी कोणालाच भेटत नव्हते, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *