राज्यात ह्युंदाईची लवकरच गुंतवणूक; एलजी, सॅमसंगचीही विस्ताराची हमी : सामंत

0
53
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या ‘ह्युंदाई’ कंपनीने पुण्यामध्ये दोन टप्प्यांत पाच हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे पुरवठादारही चार हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत.

‘एलजी’ कंपनीही उद्योगाचा विस्तार करताना ९०० कोटींची गुंतवणूक करून फोल्डेबल आणि पारदर्शी एलईडीचे उत्पादन पुण्यातून करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिली.

राज्यात अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्यासाठी सामंत यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाचे शिष्टमंडळ दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात तेथील आघाडीच्या कंपन्यांशी सविस्तर चर्चा झाली असून, त्यांनी राज्यात भरीव गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. ‘ह्युंदाई’ कंपनीने महाराष्ट्रात गंतवणूक करण्याचे ठरवले असून, कंपनी २०२८ पर्यंत दोन टप्प्यांत पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून ४५०० जणांना रोजगार मिळेल. तसेच त्यांचे पुरवठादारही चार हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. ही कंपनी २०२८नंतरही विस्तारीकरणासाठी गुंतवणूक करेल, अशी ग्वाही कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याचे सामंत यांनी सांगितले.

‘एलजी’ कंपनीही राज्यातील आपल्या उद्योगाचा विस्तार करताना सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक करणार असून, पारदर्शी आणि फोल्डेबल टीव्हीचे उत्पादन करणार आहे. त्याचप्रमाणे ‘सॅमसंग’ कंपनीही ५०० कोटींची गुंतवणूक करून अत्याधुनिक फ्रिजचे उत्पादन राज्यात करणार आहे. तसेच आईस्क्रिम निर्मिती क्षेत्रातील आघाडीची ‘लोट्टे वेलफूड’ कंपनी पुण्यातील प्रकल्पात ४७५ कोटींची गुंतवणूक करणार असून, अन्य एका कंपनीला राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक पाच एकर जागा देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दक्षिण कोरियातील उद्योजकांच्या आयात-निर्यात संस्थांचे शिष्टमंडळ लवकरच राज्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

दादागिरी मोडून काढणार

राज्यात येणाऱ्या प्रत्येक उद्योगाला मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. उद्योगांची फसवणूक किंवा पिळवणूक करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. उद्योगांना वेठीस धरणाऱ्यांची दादागिरी मोडून काढण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे आणि आपण पोलिसांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘जनरल मोटर्स’च्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची ग्वाही

”बंद पडलेल्या जनरल मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपण चर्चा केली असून, कामगारांना न्याय देण्यासाठी ‘ह्युंदाई’ कंपनी सुरू होणे आवश्यक आहे. ह्युंदाई कंपनीने जनरल मोटर्स कंपनी ताब्यात घेतली आहे. याबाबत लवकरच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येईल”, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here