एसटी संपकाळात नोकरीत रुजू होऊन गैरहजर राहिल्याने सेवा समाप्त करण्यात आल्याने आता टाईल्सच्या दुकानात हमालीचे काम

मुंबई : दुष्काळी भागातील युवकांना एसटीमध्ये नोकरी देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्या अंतर्गत खान्देशातील ५८ युवकांची एसटीत भरतीही झाली; परंतु कामावर रुजू न होताच सेवासमाप्तीची नोटीस स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
नोकरीचे स्वप्न पूर्ण होऊनही महिनाभरातच त्यांना बेरोजगार व्हावे लागले आहे. आमची बाजू मांडू न देता सरकारने आमच्यावर अन्याय केला, अशी कैफियत या युवकांनी मांडली आहे.

जळगावात राहणाऱ्या फिरोज सय्यदची परिस्थिती तशी बेताची. वडील सूतगिरणीत कामाला. फिरोज ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान २०१९ मध्ये दुष्काळग्रस्तांसाठी एसटी महामंडळात सरळ सेवा भरती निघाली. त्यासाठी फिरोजची निवड झाली. प्रशिक्षणसुद्धा पूर्ण झाले. मात्र, एसटी संपकाळात नोकरीत रुजू होऊन गैरहजर राहिल्याने फिरोजची सेवा समाप्त करण्यात आली आहे. फिरोज आता टाईल्सच्या दुकानात हमालीचे काम करत आहे. फिरोजसोबत जळगाव आणि धुळे विभाग मिळून एकूण ५८ युवकांवर आता हाताला मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. २१ नोव्हेंबरला अनिल सोनवणे एसटी बस चालवत होता. अचानक एसटीवर दगडफेक झाली. त्यात तो जखमी झाला. दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात तो जबाब नोंदवायला गेला; परंतु त्याला विभाग नियंत्रकांनी कुठलीही पूर्वसूचना न देता सेवासमाप्तीचा आदेश हातात दिला. नोकरी गेल्याने अनिल हतबल झाला आहे.

सरळ सेवा भरतीमधील पात्र उमेदवारांना नियुक्ती देऊन एसटी सेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता; परंतु नवीन उमेदवारांनी नियुक्तीनंतर दोन दिवसांनंतर संपात सहभाग घेतला. शिवाय ते गैरहजरही राहिले. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here