नवी दिल्ली,आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा समूहाची एक ऑटोमोटिव्ह कंपनी असलेल्या पिनीनफारिनाने चालकाविना धावणारा इलेक्ट्रिक तयार केला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 300 किमी चालण्याची या ट्रकची क्षमता असून, त्याचे रूप बुलेट ट्रेनसारखे आहे हा कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक ट्रक दिसायला बुलेट ट्रेनसारखा आहे. कंपनीने या ट्रकला बैदूची उपकंपनी असलेल्या डीपवेसोबत डिझाईन केले आहे. पिनीनफारिना ही एक इटालियन ऑटोमोटिव्ह डिझाईन कंपनी असून, आता त्यावर महिंद्रा समूहाची मालकी आहे.
या ट्रकमध्ये 45 केडब्ल्यूएचचा बॅटरी पॅक आहे. तो एकदा चार्ज केल्यानंतर ट्रक साधारणत: 300 किमीपर्यंत धावू शकेल. एवढेच नव्हे तर, एकावेळी 49 टन वजन घेऊन तो लांब पल्ला गाठू शकेल. अलीकडेच महिंद्रा समूहाने कारशिवाय बाईक आणि सुपरकार तसेच अन्य प्रकारच्या ऑटोमोटिव्ह सेक्शनवर लक्ष देणे सुरू केले आहे. पिनीनफारिनाचा हा ट्रक त्यादिशेनेच टाकलेले एक पाऊल आहे. कंपनीने या ट्रकला 11 ऑन-बोर्ड वाईड अँगल कॅमेरा, इन्फ’ारेड डिटेक्टर, रडार आणि लिडार सेंसर्ससह सज्ज केले आहे. या सर्व उपकरणांच्या आधारे हा ट्रक चालकाविना चालू शकणार आहे. कारण, त्याला सेल्फ ड्रायव्हिंगसाठी सक्षम करण्यात आले आहे. याशिवाय ट्रकच्या केबिनमध्ये जास्तीत जास्त प्रीमियम आणि हायटेक फिचर्सचा वापर करण्यात आला आहे.