बीड लिंबारुई देवी येथे बॉम्ब फुटणार ;तरुणाच्या पोस्टने खळबळ , तपासात भलताच उलगडा

 

बीड : तालुक्यातील लिंबारुई देवी येथे आता बॉम्ब फुटणार, अशी पोस्ट गावातील एका पुणेस्थित तरुणाने समाजमाध्यमावर टाकली अन् ग्रामस्थांची झोप उडाली.पिंपळनेर पोलिसांनी गावात धाव घेतली, त्यानंतर ही पोस्ट राजकीय अर्थाने असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

झाले असे, लिंबारुई देवी येथील एक तरुण सध्या पुण्याला राहताे. २ जानेवारी रोजी सकाळी त्याने समाजमाध्यमावर लिंबारुई देवी येथे आता बॉम्ब फुटणार, अशी पोस्ट केली. गावाला चिकटून तलाव असून तेथे मुरूम उपशासाठी जिलेटीन कांड्यांचा हमखास स्फोट केला जातो. मात्र, गावात बॉम्बस्फोट होणार असल्याच्या पोस्टने अनेकांना घाम फुटला. गावात एकच दहशत पसरली. दरम्यान, सरपंच सारिका रुस्तुम शिंदे, उपसरपंच नारायण नांदे यांनी पिंपळनेर ठाण्यात लेखी तक्रार दिली.

योग्य ती चौकशी करून पोस्ट करणारा नामदेव मोतीराम डोळस याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी गावात धाव घेत खातरजमा केली तेव्हा ही पोस्ट राजकीय अर्थाने असल्याचे समोर आले. मात्र, पोलीस व गावकऱ्यांची यामुळे नाहक धावपळ उडाली.

राजकीय पोस्ट
गावात जाऊन खात्री केली आहे. राजकीय हेव्यादाव्यातून ही पोस्ट केली होती, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल बंद येत आहे. त्यास समज देण्यात येणार आहे.
– बाळासाहेब आघाव, सहायक निरीक्षक, पिंपळनेर ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here