महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात अक्षरशः थैमान, अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, नागरिकांनो काळजी घ्या
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासासांठी मराठवडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा हा धुमाकूळ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही असण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर उद्याही कायम असण्याची शक्यता आहे. या पावसाची तीव्रता 4 सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार
पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे छोटे-मोठे ओढे आणि नद्यांना पूर आला आहे. विशेष म्हणजे लातूरसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणखी जोराने पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान होत आहे. अनेक शेतात पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर, अहमदपूर, रेणापूर, चाकुर, निलंगा भागात पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस
नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. दुपारी एकच्या नंतर हवामान खात्याने नांदेड जिल्हा रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. जिल्ह्यातील 26 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीसह इतर छोटे-मोठे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. पण आज झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आलं आहे. अनेक भागात शेतामध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे मूग, सोयाबीन सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैनात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. जिल्ह्यातील ६३मंडळांपैकी २६ मंडळांमध्ये ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. किनवट, हिमायतनगर, हदगाव, भोकर, मुदखेड आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात नदी-नाल्यांना मोठा पूर
अति मुसळधार पावसानं जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना मोठा पूर आला आहे. मानोरा ते कारंजा रस्ता दापुरा जवळच्या नाल्याला आलेल्या मोठ्या पुराने बंद झाला आहे. तसेच इंझोरी गावाजवळील नाल्याला मोठा पूर आल्यानं इंझोरी-जामदरा रस्ता बंद झाला आहे. शेतात गेलेले शेतकरी अडकल्यानं त्यांचे हाल होत आहेत. तर मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी बोरव्हा परिसरातील नाल्यानाही मोठा पूर आला आहे. पोहरादेवी शिवारामधील शेतात पाणी घुसल्यानं शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे.
बीडमध्येबी मुसळधार पाऊस
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात 24 तासांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने नागापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आबे. संततधार पावसामुळे परळी शहरासह 15 गावांना पाणी पुरवणारे नागापूर धरण ओसंडून वाहत आहे. धरणातील पाणी वाण नदीपत्रात सोडल्यामुळे नदीचे पाणीही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
परभणीत नागरी वस्तीत शिरलं पावसाचं पाणी
परभणीत पावसाचा जोर कायम आहे. परभणीत कालपासून 65 ते 70 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. हळूहळू पाणी आता सखल भागात असलेल्या नागरी वस्त्यात शिरत आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी घरात जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. अशीच परिस्थिती राहिली तर अतिवृष्टी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
हिंगोली पावसाचा हाहा:कार
हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. हिंगोली शहरातील बांगर नगर परिसरात असलेल्या मॉलमध्ये शटर तोडून पाणी आत मॉलमध्ये शिरलं आहे. मॉलमध्ये आत्ताही डोक्याच्या वर पाणी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. पत्त्याप्रमाणे मॉलमधील किराणा, फ्रीज काउंटर, असं साहित्य वाहून गेल्याचंही व्यापाऱ्यांनी tv9 मराठी शी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जळगावच्या मुक्ताईनगरमध्येही मुसळधार पाऊस
जळगावच्या मुक्ताईनगरमध्येही मुसळधार पाऊस पडला आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर विजेच्या कडकडाटांसह मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उष्णतेपासून हैरान झालेल्या नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे