हेदेखील सनातन सत्य आहेच, ठाकरे गटाचे भाजपावर शरसंधान

0
42
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : इंडिया आघाडीतील ‘द्रमुक’ पक्षाचे पुढारी सनातन धर्माविषयी विचित्र टीकाटिपण्या करतात. ते धर्म मानीत नाहीत, धर्म नावाची कोणतीही व्यवस्था ते मानत नाहीत. ही त्यांची भावना. त्यांच्या विचारांशी इतर कोणी सहमत असण्याची शक्यता नाही. आमचा सवाल इतकाच आहे की, तामीळनाडूतले दक्षिणी किंवा द्रविडी मंडळी सनातन विचार मांडत नाहीत म्हणून सनातन धर्माचे काही नुकसान झाले आहे काय? अजिबात नाही. त्याच वेळी स्वयंघोषित ‘सनातन’वादी भाजपाचाही विस्तार तामीळनाडूत होऊ शकला नाही, हेदेखील सनातन सत्य आहेच, असे शरसंधान ठाकरे गटाने केले आहे.

तामीळनाडूच्या भूमीवर अनेक शतके हिंदू-सनातन धर्म उभा आहे. जगातील सर्वोत्तम व मोक्षाचा मार्ग दाखविणारी हिंदू मंदिरे याच भूमीवर आहेत. आध्यात्मिक अनुभवासाठी प्रतिवर्षी लाखो श्रद्धाळू येथे येत असतात. इसवी सन सातव्या आणि दहाव्या शतकादरम्यान उभारल्या गेलेल्या येथील असंख्य मंदिरांकडे श्रद्धेने पाहिल्यावर वाटते की, ‘सनातन धर्मा’च्या विरोधानंतरही ही सर्व मंदिरे अगणित श्रद्धाळूंना प्रेरणा व ऊर्जा देत आहेत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

तामीळनाडूत आज सनातन विरोधकांचे राज्य आहे व गेल्या काही दिवसांपासून ही मंडळी सनातन धर्मावर टीकाटिपणी करीत आहेत. जो धर्म तलवारीच्या धाकाने संपविता आला नाही तो धर्म शाब्दिक टीकेने अजिबात हतबल होणार नाही. पुन्हा त्याच तामीळ भूमीवर आज सनातन धर्माची पताका फडकत आहे. तेव्हा राजकीय विचार व धर्म यांची गल्लत करू नये, असा सल्लाही या अग्रलेखात देण्यात आला आहे.तामीळनाडूतील सनातन धर्माची महती काय वर्णावी? तामीळनाडूतील चिदंबरम मंदिर हे भगवान शिवाच्या सात पवित्र हिंदू मंदिरांपैकी एक आहे. ते सप्तपुरी म्हणून ओळखले जाते. केदारनाथ, काशी विश्वनाथ, सोमनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि अमरनाथ ही इतर सहा मंदिरे आहेत. सर्वात लक्षणीय मंदिरांपैकी एक असलेले नटराज मंदिर याच राज्यात आहे. नटराजाचे हिंदू धर्मातील महत्त्व मोठे आहे. शिवाय राजा चोल याने 1003 मध्ये बांधलेले बृहडीश्वर मंदिर येथेच आहे. रामेश्वरम मंदिर हे शिवाला समर्पित आहे व ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मदुराईतील मीनाक्षी मंदिर लोकप्रिय आहे. हे मंदिर जगभरात वास्तुशिल्प आणि शिल्पकलेसाठी प्रख्यात आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.तामीळनाडूत 40 हजारांहून अधिक हिंदू मंदिरे आहेत. म्हणजे ही मंदिरांची भूमी आहे. या देवभूमीवरून जे सनातन धर्म संपवू शकले नाहीत, ते या पृथ्वीवरील धर्म कसा संपवतील? याच तामीळनाडूतील तंजावर प्रांतावर शहाजीराजांचे शूर पुत्र व छत्रपती शिवाजीराजांचे भाऊ व्यंकोजीराजे भोसले यांचे राज्य होते व त्यांनीही येथे हिंदू धर्म टिकवला. तंजावरचा गणपती व दसरा उत्सव आजही जोरात होतो, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here