मध्य प्रदेशमध्ये पावसाचा कहर, 61 वर्षांचा रेकॉर्ड तुटला; पुराच्या पाण्यात माजी मंत्र्यांचा मुलगा वाहून गेला

0
220
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मध्य प्रदेशात पावसाचा कहर सुरू असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने इंदूरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

आगामी एक-दोन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

इंदूरमध्ये कोसळणाऱ्या पावसाने गेल्या 61 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. 20 सप्टेंबर 1962 रोजी इंदूरमध्ये जवळपास 169 मिमी पावसाची नोंद झाली होती. हा रेकॉर्ड शुक्रवारी आणि शनिवारी पडलेल्या पावसाने मोडला आहे. गेल्या 24 तासांत 171 मिमी पाऊस पडल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले असून यशवंत सागर धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यशवंत सागर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महापौर पुष्यमित्र भार्गव, व आयुक्त इलैया राजा टी यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच नागरिकांनी पाणी साचलेल्या ठिकाणी वाहने नेऊ नयेत, असे आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

माजी मंत्र्यांचा मुलगा वाहून गेला अन्…

इंदूरजवळील महू येथील कलाकुंड येथे चोरल नदीत तीन तरुण महिंद्रा थारसह वाहून गेले. नदीच्या मध्यभागी असलेल्या झुडुपात गाडी अडकल्याने तिघेही बचावले. या झुडुपांचा आधार घेत तिघेही मदतीसाठी हाका मारत होते. एका गावकऱ्याला त्यांचा आवाज ऐकू गेल्याने त्याने तातडीने पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हजर झाले. गावकऱ्यांच्या मदतीने तब्बल सात तासांच्या मेहनतीनंतर या तीनही मुलांना बाहेर काढण्यास यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तीन तरुण कलाकुंड येथे पर्यटनासाठी आले होते. रात्री उशिरा फार्महाऊस वरुन परतत असताना उतेडिया गावाजवळील चोरल नदी ओलांडत असताना पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ते वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचावकार्यानंतर तिघांना वाचवण्यात यश आले. यातील एक तरुण माजी मंत्री रंजना बघेल यांचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. नदी दुथडी भरून वाहत असल्याने ग्रामस्थांसह बघेल यांचा मुलगा व त्याच्या मित्रांना नदीच्या पलीकडे रात्र काढावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here