“अन्यथा दलालांचे खिसे भरणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही”

0
89
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : पुढच्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत आहे आणि महागाईने प्रचंड मोठे आगडोंब उसळले आहे. मोदी सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की, महागाई आम्ही कमी करू!

४०० रुपयांवर असलेले गॅस सिलेंडर आता सबसिडी दिल्यानंतरही सामान्य नागरिकांना घेणे परवडत नाही. तूर डाळीचा भाव हा ६०-७० रु. किलो होता तो आज १७० रु. किलो झालेला आहे. डाळी महाग, कडधान्ये महाग व गोड तेलदेखील महाग. यामुळे लोकांनी खायचं कसं आणि जगायचं कसं? असा सवाल राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्या, प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी सरकारला केला आहे.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, चटणी- भाकरी खाण्यासाठी जो लसूण लागतो तो सुद्धा २००- २५० रु. किलो आहे, आलं २०० रु. किलो आहे. माणसाने खायचं काय? मटन, मांस, मच्छी व अंडी हे मध्यमवर्गीयांच्या हातापलीकडे गेलं आहे. शेतकऱ्याला आज टोमॅटोवर दोन रुपये किलोसुद्धा भाव मिळत नाही. जेव्हा तुर डाळ १७० रु. किलो होता तेव्हा क्विंटलचे १७ हजार रु. व्हायला पाहिजे आणि त्यातील किमान १० ते १२ हजार रु. तरी शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत. पण मोदी सरकार हे दलालांचे सरकार असल्यामुळे दलालांचे खिसे भरण्यासाठी ऐन सणासुदीच्या काळात प्रचंड महागाई वाढत आहे. असा हल्लाबोल देखील त्यांनी मोदी सरकारवर चढवला आहे.

दरम्यान, साखरेचे दरसुद्धा वाढलेले आहेत. म्हणजे गरिबांनी दिवाळी आणि गणपती हे सण कसे साजरे करायचे? वर्षभर महागाईने पिचलेल्या व दुःखी झालेल्या महिलांना आनंदाच्या शिधेसाठी लाईनीत उभे राहावे लागते. त्यातही सरकारची जाहिरातच मोठी असते. आनंदाच्या शिधेची एवढीशी पिशवी किती दिवस पुरणार आहे? त्यापेक्षा सरकारने वाढलेली महागाई कमी करावी. महागाईचा मोबदला हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, शेतकरी अन्नदाता आहे. परंतु शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. सरकार भाजीपाला, फळे, कडधान्ये, डाळी व गोड तेल यांचे भाव का नियंत्रणात ठेवू शकले नाही? याचे उत्तर भाजपाने देणे आवश्यक आहे. अन्यथा दलालांचे खिसे भरणाऱ्या या सरकारला धडा शिकवल्याशिवाय सामान्य जनता गप्प बसणार नाही. असंही त्या म्हणाल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here