ईडा, पिडा टळो…डेंग्यू, खड्डे घेऊन जा ఽఽ गे मारबत…; रिमझिम पावसात मारबत उत्सव जोरात

0
59
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नागपूर : रिमझिम पाऊस यात डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई…ढोलताशांचा कर्णकर्कश्श गजर…मनातल्या भावनांचा निचरा करणाऱ्या दमदार घोषणा…बेधुंद नृत्याचा जल्लोष…आणि ईडा, पिडा टळो…डेंग्यू, खड्डे घेऊन जा ఽఽ गे मारबत…अशी साद देत शुक्रवारी नागपुरात मारबत उत्सव रंगला.

तब्बल 143 वर्षांपासून अव्याहतपणे चालू असणारी ही परंपरा आहे. केवळ नागपुरातच काढण्यात येणाऱ्या या मारबत उत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला राग आणि संताप व्यक्त होत होता. सामान्य माणसांना व्यक्त होण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळत नाही, पण मारबत उत्सवाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांना त्यांच्या पद्धतीने अभिव्यक्त होण्याची संधी देणारा हा लोकोत्सव लोकांच्या प्रचंड प्रतिसादाने गाजला.

प्रचंड गर्दी, संदल, वाजंत्रीच्या तालावर नृत्याचा आनंद घेत प्रामुख्याने युवकांनी या उत्सवात लक्षणीय सहभाग घेतला. या काळात रोगराई वाढते. त्यामुळे साधारणत: दरवर्षीच ‘ईडा पिडा घेऊन जाఽఽ गे मारबत’ अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो. मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे. यात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते.

काळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडल्या जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यानी तिची मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर समस्या, संकटे येत नाहीत, अशी आख्यायिका आहे. याच संदर्भाने नागपुरातही पिवळी मारबत काढण्यात येते. या मारबतींना शहराच्या बाहेर जाळल्याने शहरातील कुरीती आणि संकटे संपतात, अशी मान्यता आहे.

१८८१ साली नागपूरच्या राजे भोसले घराण्यातील बकाबाई नावाच्या राणीने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्यामुळे राजे भोसलेंचा पराभव झाला. त्यानंतर भोसले घराण्याला वाईट दिवसांना सामोरे जावे लागले म्हणून बकाबाईच्या नावाने काळी मारबत काढण्याची परंपरा सुरू झाली. त्यानंतर जनतेच्या मनातील आक्रोश व्यक्त होताना यात बडग्या उत्सवालाही प्रारंभ झाला. पाडव्याचा सण साजरा करताना अनेक मंडळांनी आपल्या मनातील संताप व्यक्त करताना बडग्यांच्या माध्यमातून अनेक मुद्यांवर आपला आक्रोश व्यक्त केला. याप्रसंगी विविध बडग्यांवर अनेक फलक लिहून काही वाक्ये लिहिण्यात आली होती. केवळ नागपूरकरच नव्हे तर विदर्भ आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील नागरिकही या उत्सवासाठी खास नागपुरात आले होते. त्यांच्या उपस्थितीने हा उत्सव रंगला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here