ताज्या बातम्यामहत्वाचे

‘इंडिया’च्या सभांचा झंझावात, ऑक्टोबरमध्ये भोपाळ येथे पहिली जाहीर सभा


केंद्रातील सत्ताधारी भाजप विरोधात देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ या नावाने एकत्र येत ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया!’ असा बुलंद नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार केला आहे.

ऑक्टोबरपासून ‘इंडिया’ आघाडीच्या सभांचा देशभरात धडाका सुरू होणार असून पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे होणार आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीच्या यशस्वी आयोजनानंतर ‘इंडिया’च्या समन्वय समितीची पहिली बैठक आज राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवास्थानी पार पडली. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबद्दल प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत, द्रमुकचे नेते टी. आर बालू, राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, संजय झा, आम आदमी पार्टीचे राघव चढ्ढा, समाजवादी पार्टीचे जावेद अली खान, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते व झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे डी. राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती हे नेते उपस्थित होते.

सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्रातली मोदी सरकारविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त करतानाच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ‘इंडिया’ची पहिली जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले. समन्वय समितीच्या बैठकीत देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जागावाटपाचे सूत्र ठरविण्याबाबत चर्चा झाल्याचे के.सी.वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.

वादग्रस्त टीव्ही अँकरच्या कार्यक्रमापासून दूर राहणार

देश आणि समाजात फूट पाडण्याचे कार्यक्रम घेऊन राजकीय अजेंडा राबविणाऱया टीव्ही अँकर्सच्या शोपासून दूर राहण्याचा व अशा कार्यक्रमात आपल्या प्रवक्त्यांना न पाठविण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. अर्थात, याबाबतची समीक्षा ‘इंडिया’ची मीडियाविषयक सब कमिटी करेल. सब कमिटीच याबाबतीत निर्णय घेईल, असे यावेळी ठरविण्यात आले. सब कमिटी वादग्रस्त टीव्ही अँकर्सची यादी तयार करून कुठल्या शोमध्ये प्रतिनिधी म्हणून प्रवक्ते पाठवायचे किंवा नाही हे ठरवेल.

तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जींना ईडीचे समन्स

‘इंडिया’ बैठकीचा मुहूर्त साधून ईडीने समन्स बजावल्याने तृणमूल काँग्रेसचे नेते, खासदार अभिषेक बॅनर्जी बैठकीला हजर राहू शकले नाहीत. तर संयुक्त जनता दलाचे लल्लन सिंह हे आजारी असल्याने बैठकीला उपस्थित नव्हते.

जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय

इंडिया आघाडीतील पक्षांच्या जागावाटपाबाबत प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्व सहकारी पक्षांशी बोलणी करुन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कॉँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगापाल यांनी दिली. दरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले, ज्या जागा इंडिया आघाडीतील पक्षांकडे आहेत, त्या जागांवर चर्चा होणार नाही. आम्ही भाजप, एनडीएकडे असलेल्या जागांबाबत चर्चा करू.

बैठकीत काय ठरले…

मोदी सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. रविवारी दुपारी साडेचार वाजता ही बैठक होणार आहे. विशेष अधिवेशनात मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीविषयीचे विधेयक सरकारकडून चर्चा आणि मंजुरीसाठी सादर होणार असल्याचे आज स्पष्ट करण्यात आले. संसदेच्या 75 वर्षांतील वाटचालीवर पहिल्या दिवशी, 18 सप्टेंबरला चर्चा होईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *