भारत-पाक सामन्याला झुकते माप; अंतिम सामन्यासाठीही अतिरिक्त दिवस

0
101
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

कोलंबो : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोरमध्ये चार संघ असले तरी आशियाई क्रिकेट परिषदेला केवळ भारत-पाक लढतीचेच महत्त्व अधिक आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या या लढतीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला.

भारत-पाक यांच्यात अंतिम लढत अपेक्षित धरून त्यासाठीही राखीव दिवसाचे प्रयोजन केले आहे.

कोलंबोत होत असलेल्या या सुपर फोरच्या लढतीत पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता अधिक आहे. कोलंबोत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण स्पर्धा आता पाण्यात जाण्याची शक्यता असल्यामुळे आशिया क्रिकेट परिषदेने भारत-पाक सामन्यालाच प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.

आशिया करंडक म्हणजे जणू भारत-पाक असे समीकरणच तयार करण्यात आले होते. आता तर त्याच दृष्टीने या सामन्याला झुकते माप देण्यात आले. रविवारी भारत-पाक सुपर फोरमधील सामना होत आहे. पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तर सोमवारी सामना होईल किंवा रविवारी खेळ सुरू झाला आणि पावसाचा व्यत्यय आला तर खेळ जेथे थांबला जाईल तेथून दुसऱ्या दिवशी उर्वरित खेळ होईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील भारत-पाक साखळी सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता, त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २६६ धावांपर्यंत मजल मारली होती; परंतु पावसामुळे पाकचा डाव सुरू होऊ शकला नव्हता. अशी परिस्थिती जर रविवारच्या सामन्यात आली तर स्पर्धेची रंगत निघून जाईल, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

स्पर्धा श्रीलंकेत खेळवण्यावरून पाक क्रिकेट मंडळाचा सुरुवातीपासून विरोध होता. श्रीलंकेत प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या अल्प प्रतिसादाचा फटका तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उप्तन्नावर होत आहे, जय शहा अध्यक्ष असलेल्या आशिया क्रिकेट परिषदेने त्याची भरपाई आम्हाला द्यावी, अशी मागणी यजमानपद असलेल्या पाक मंडळाचे कार्याध्यक्ष झाका अश्रफ यांनी केली आहे.

सप्रीत बुमरा संघासोबत सराव

भारताचा हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पुन्हा कोलंबोत दाखल झाला असून त्याने रविवारी होणाऱ्या पाकविरुद्धच्या सामन्यासाठी सराव सुरू केला. बुमरा शुक्रवारी सकाळी कोलंबोत आला. अपत्याच्या प्रतीक्षेत असलेला बुमरा ३ सप्टेंबरला मुंबईत परतला होता. त्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला. आता पुन्हा एकदा तो टीम इंडियाच्या सेवेत रुजू झाला आहे.

स्पर्धेतील बाकी असलेले सामने

  • श्रीलंका वि. बांगलादेश (९ सप्टेंबर)
  • भारत वि. पाक (१० सप्टेंबर)
  • राखीव दिवसाची सोय
  • भारत वि. श्रीलंका (१२ सप्टेंबर)
  • श्रीलंका वि. पाक (१४ सप्टेंबर)
  • भारत वि. बांगलादेश (१५ सप्टेंबर)
  • अंतिम सामना (१७ सप्टेंबर) राखीव दिवसाची सोय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here