नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी जी-२० मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्यात आला आहे. परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी हा प्रस्ताव मांडला, पंतप्रधानांनी मांडलेला हा प्रस्ताव सर्वसंमतीने स्वीकारला गेला.
शिखर परिषदेत आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी आफ्रिकन युनियनला जी-२० मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.’
यानंतर, परिषदेत सहभागी जागतिक नेत्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कोमोरोसचे राष्ट्राध्यक्ष आणि आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अझाली उस्मानी यांना जी-२० सदस्य देशांसह आसनावर बसवले. जी-२० मध्ये सामील झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांचे आभार मानले.
आफ्रिकन युनियनच्या सदस्य देशांची संख्या ५५ आहे. या ५५ देशांची एकूण लोकसंख्या १.३ अब्ज आहे. त्यामुळे आफ्रिकन युनियनला जी-२० मध्ये समावेश करण्याची मागणी होती. भारताच्या पुढाकाराने आज आफ्रिकन युनियन जी-२० मध्ये सहभागी झाली आहे.