गिरणी कामगारांना पक्की घरे व वारसांना सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात आज बैठक पार पडली.या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांबाबत व वारसांच्या नोकरीसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गिरणी कामकारांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. गिरणी कामगार घरापासून वंचित आहेत. मात्र आमचं सरकार गिरणी कामगारांना नक्की घरे देणार आहे. गावाजवळ जे गिरणी कामगार घर घेण्यास तयार आहेत, त्यांना त्यापद्धतीने अर्थसहाय्य दिलं जाईल. त्याचबरोबर गिरणी कामगारांसाठी मुंबईतील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याला वेग दिला जाईल. एनटीसीच्या जागेवर धोरण बदलून घर कशी देता येतील याचा प्रयत्न केला जाईल. गिरणी कामगारांसाठी म्हाडामार्फत पाच हजार घरांची लॉटरी काढली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गिरणी कामगारांच्या वारसांना सरकारी नोकरी –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारकडून म्युझियमचं काम सुरु आहे. त्याठिकाणी गिरणी कामगारांच्या वारसांना नोकऱ्या देण्यात येतील. यावर आजच्या बैठकीत झाली, अशी माहिती त्यांनी दिली.
या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,खासदार धैर्यशील माने, राहुल शेवाळे,आमदार मंगेश कुडाळकर,प्रकाश आवाडे,सर्वश्री कालिदास कोळंबकर, अतुल भातखळकर, सुनील राणे, प्रकाश आबिटकर, माजी आमदार नरसय्या आडम, ख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, गोविंदराज यांच्यासह गिरणी कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.