भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया कप 2023 साठी आपला संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर हे १७ सदस्यीय संघात परतले आहेत.पण ब्रॉडकास्टरने भारतीय संघाच्या घोषणेच्या वेळी एक सर्वात मोठी चूक केली.
ब्रॉडकास्टरने सोमवारी दुपारी १.२६ वाजता भारतीय संघाच्या घोषणेची माहिती दिली. पण हे करत असताना त्यांनी शुभमन गिलला संघातून वगळले. टीम इंडियाच्या स्क्वॉडमधून शुभमन गिलचे नाव गायब होते. यानंतर काही क्षणात ही बातमी वणव्यासारखी सगळीकडे पसरली होती. पण ब्रॉडकास्टरने काही वेळातच आपली चूक सुधारली.
बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांच्या पत्रकार परिषदेत ही चूक सुधारण्यात आली. त्यांनी संघाची अधिकृत घोषणा केली तेव्हा त्यात शुभमन गिलचे नाव होते. यानंतर, ब्रॉडकास्टरने दुपारी १.३५ वाजता दुसरी टीम शेअर केली, ज्यामध्ये गिलचे नाव जोडले गेले. अशाप्रकारे गिल ९ मिनिटांत संघात परतला.
या गोंधळाबाबत सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आणि शुभमन गिल ट्रेंड करू लागला. यावरून चाहत्यांनी ब्रॉडकास्टर आणि बीसीसीआय दोघांनाही ट्रोल केले. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने एका माशाचा फोटो शेअर करून अप्रत्यक्षपणे ब्रॉडकास्टर्सची खिल्ली उडवली आहे.
जाफरने माशांचे २ फोटो शेअर केले आहेत. एका फोटो मेलेला मासा दिसत आहे. या फोटोवर त्याने १.२६ वाजता असे कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या फोटोतील मासा जिवंत आणि हसताना दिसत आहे. या फोटोला १.३५ असे कॅप्शन दिले आहे. म्हणजेच, गिलचे संघात नाव नसताना आणि गिलचे संघात नाव आल्यानंतर चाहत्यांची काय स्थिती होती, हे जाफरने सांगितले आहे. जाफरची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.