जगप्रसिध्द रांजणखळगे पाहण्यास पर्यटकांची पसंती

0
72
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे – नगर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या कुकडी नदीवरील जगप्रसिद्ध कुंड पर्यटन क्षेत्रातील रांजणखळग्याचे विलोभनीय दृश्य पहाण्यासाठी आणि मळगंगा देवीच्या दर्शनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे.सुट्टीच्या दिवसभरात येथे हजारो पर्यटकांनी हजेरी लावत आहे. पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) पासून 3 तर नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) पासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसराचा विकास दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात झाला आहे. गेली 15 ते 20 वर्षांपासून येथे विकासाची प्रक्रिया सुरू असून जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचे स्थान असून ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या लोकसहभागातून मळगंगा देवीची मंदीरे बांधण्यात आली आहेत. तसेच तिर्थक्षेत्र अंतर्गत विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे.

 

पावसाळ्यात पाणी वाहत असतानाचे नेत्रदिपक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक आणि भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत. शिरूर आंबेगाव चे लोकप्रतिनिधी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून माजी आमदार पोपटराव गावडे आणि स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्या पाठपुराव्यामुळे टाकळी हाजी कुंड परिसरात पुणे – नगर जिल्ह्याला जोडणारा पुल, सिंगापूर धर्तीचा झुलता पूल, विश्रामगृह, सामाजिक सभागृह, अशी कोट्यवधी रुपयांची विकासकामे या परिसरात झाली आहेत. नदीला पाणी असल्याने रांजणखळगे परिसरातील धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहेत.

 

रांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळग्यांची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजणखळगे तयार होतात. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे.

 

नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला थोडी-थोडकी नव्हे तर हजारो वर्षे जावी लागतात. कालांतराने या खड्ड्यांचे रांजणाकार खळग्यांत रूपांतर होते. अशाप्रकारे हे रांजणखळगे तयार झाले आहेत. या रांजणखळग्याची नोंद गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली असून देशातील व परदेशातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असले तरी दोन्ही जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने विकासकामांना गती दिल्यास वर्षभर येथे पर्यटकांची रेलचेल राहील. असा विश्वास या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here