मुंबई: मुंबई विद्यापीठाने रातोरात पत्रक काढून मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या आहेत.निवडणुकांना स्थगिती देताना विद्यापीठाने कोणतंही सबळ कारण दिलं नाही. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांमधून संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी तर थेट राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी पहाटेचा मुहूर्त निश्चित केला नाही, याबद्दल आपले आभारी आहोत, असा खोचक टोला अमित ठाकरे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत. उद्या शनिवारी दुपारी अडीच वाजता मनसेच शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. मुंबई विद्यापीठाने अचानक सिनेट निवडणुका स्थगित केल्याने राज्यपालांची भेट घेणार आहे. सिनेटसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाच निवडणुका स्थगित केल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारच्या दबावामुळे निवडणुका स्थगित केल्याचा मनसेचा आरोप आहे.