नागपंचमीसाठी शिराळानगरी सज्ज झाली असून, नागपंचमी उत्सव सुरळीत पार पडावा, याकरिता प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता 600च्या वर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.त्यामध्ये एक पोलीस उपअधीक्षक, 14 पोलीस निरीक्षक, 35 सहायक पोलीस उपनिरीक्षक, 420 पोलीस कर्मचारी, 50 महिला पोलीस अंमलदार, 50 वाहतूकदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंबामाता मंदिर परिसर, मिरवणूक मार्ग या ठिकाणी 20 सीसीटीव्ही कॅमेरे, चार वॉच टॉवर ठेवण्यात आले आहेत. 20 व्हिडीओ कॅमेऱयांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. दंगलविरोधी पथक-1 असणार आहे. पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील व डॉ. एन. बी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, एसटी बस स्थानक, नगरपंचायत व्यापारी हॉल, पाडळी नाका, शनिमंदिर, समाजमंदिर, नायकुडपुरा आदी सात ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्य पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. शहरात शनिवारपासून तीन दिवस 52 आरोग्य पथके तयार केली असून, पाणी तपासणी, तसेच हॉटेल व खाद्यपदार्थ स्टॉल्सची तपासणी केली जाणार आहे. अत्यावश्यक बाबींसाठी उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांची तपासणी करून त्या अद्ययावत ठेवण्यात आल्या आहेत.
शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी शहरात स्वच्छता मोहीम राबविली असून, पाणी व आरोग्याची दक्षता घेतली आहे. वन खात्याने मोठा फौजफाटा मागविला असून, उपवनसंरक्षक नीता कट्टे व डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल म्हतेश बगले यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे 135 अधिकारी-कर्मचारी, तसेच 32 गल्ल्यांमध्ये प्रत्येक गल्लीसाठी चार पथके, उर्वरित चार गल्ल्यांमध्ये एक पथक अशा एकूण सहा गस्ती पथकांची नियुक्ती केली आहे.
या पथकात आठजणांची नियुक्ती केली आहे. तसेच सात ठिकाणी तपासणी नाके आहेत. शहरातील 32 गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष राहणार आहे.
जादा बसेस सोडण्यात येणार
n नागपंचमी उत्सवास येणाऱया भाविकांसाठी शिराळा तालुक्याअंतर्गत व बाह्यमार्गांवर शिराळा आगारातील जादा 53 व इतर आगारांतील जादा 20 बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. शिराळा-ईश्वरपूर, शिराळा-कोकरूड, शिराळा-बांबवडे, शिराळा-कोडोली या मार्गांवर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. शिराळाकडून ईश्वरपूरकडे जाणारी वाहतूक कापरी-कार्वे-लाडेगावमार्गे ईश्वरपूर, तसेच ईश्वरपूरकडून शिराळाकडे येणारी वाहतूक पेठमार्गे एकेरी होणार असून, साई संस्कृती येथे तात्पुरता बसथांबा उभारण्यात आला आहे.