मराठी सिनेसृष्टीसह हिंदी कलाविश्वात अढळ स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखले जाते. तो त्याच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे तो कायमच चर्चेत असतो. जितेंद्र जोशी हा एक उत्तम अभिनेताच नव्हे तर उत्तम कवीदेखील आहे.समाजात घडणाऱ्या अनेक विषयांवर तो कवितेच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. नुकतंच जितेंद्र जोशीच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
जितेंद्र जोशी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच जितेंद्रने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने कवितांचा वापर करणाऱ्यांबद्दल भाष्य केले आहे. तसेच कवितेचा वापर करुन रील बनवणाऱ्यांवरही त्याने संताप व्यक्त केला आहे.
“एखाद्याच्या आवाजातील त्याचीच कविता स्वत:चा रील बनवण्यासाठी वापरताना त्या माणसाच्या नावाचा उल्लेख सुद्धा करु नये हे वाटण्याचा निर्लज्जपणा किंवा बेफिकिरीमधून येणारा उद्दामपणा कुठून येत असावा?” अशी पोस्ट जितेंद्र जोशीने शेअर केली आहे.
जितेंद्र जोशी
जितेंद्र जोशीची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्याने ही पोस्ट कशाबद्दल आणि कोणाबद्दल केली आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान जितेंद्र जोशी हा काही दिवसांपूर्वी ‘गोदावरी’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये स्थान मिळवलं होतं. या चित्रपटात जितेंद्र जोशीने प्रमुख भूमिका साकारली होती.