डब्लिन : खरे तर मी अजिबात चिंताग्रस्त नव्हतो. कधी एकदा मैदानात उतरतोय, याची उत्सुकता होती आणि पुनरागमन करताना फारच आनंदी होतो, असे मत बुम… बुम… स्टाईल पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराने व्यक्त केले.३२७ दिवसांनंतर तो पुन्हा मैदानात उतरला आणि पहिल्याच सामन्यात सामनावीरही ठरला.
आयर्लंडविरुद्ध शुक्रवारी झालेला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यावर तमाम भारतीयांचे लक्ष होते. बुमरा केंद्रस्थानी होता. दणक्यात पुनरागमन करताना त्याने भारतीय संघाला मोठा दिलासा दिला. तंदुरुस्तीबरोबर आपला पूर्वीचा जोशही त्याने पहिल्या षटकापासून सादर केला.
पाठीच्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळू शकला नव्हता. भारतीय संघासाठी तो मोठा फटका होता. आता मायदेशात येत्या काही दिवसांत एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा होत आहे, त्यासाठी बुमरा तंदुरुस्त होणे, हे भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेस तो कसा समोरे जातो, यावर सर्वांचे लक्ष होते.
इतक्या मोठ्या कालावधीनंतर मी संघात परतत आहे. शिवाय पाठीची दुखापत, त्यावर झालेली शस्त्रक्रिया, नंतर पूनर्वसनाची प्रक्रिया हे अडथळे पार केल्यानंतर साहजिक कोणालाही दडपण आणि चिंता वाटली असती; पण मी अजिबात चिंताग्रस्त नव्हतो, पुनरागमनाचा चांगलाच आनंद घेत होतो, असे बुमराने सामन्यानंतर सांगितले. या लढतीत बुमराने चार षटकांत २४ धावांत ४ बळी अशी कामगिरी केली.
ट्वेन्टी-२० प्रकारात बुमराने प्रथमच देशाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच सामन्यात विजय मिळवणारा तो कर्णधार ठरला. याबाबत विचारले असतो तो म्हणाला, जेव्हा तुम्ही कर्णधार असता तेव्हा संघाचा विचार अधिक करत असता. त्यावेळी तुमच्या वैयक्तिक कामगिरीवर लक्ष नसते. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे निकाल लागलेल्या या सामन्यात भारताने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला.
चार षटके गोलंदाजी केल्यावर आणि पूर्ण २० षटके मैदानावर क्षेत्ररक्षण केल्यावर मला चांगले वाटत आहे. अशा अनेक सत्रांचा अभ्यास मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत केला आहे. त्यामुळे क्रिकेटपासून मी फार दूर होतो, असे अजिबात वाटत नव्हते. फरक एवढाच, की आंतरराष्ट्रीय सामने खेळत नव्हतो, असे बुमराने सांगितले.
मला पुन्हा मैदानावर आणण्यात सपोर्ट स्टाफ आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या सहायकांचा वाटा मोलाचा आहे. यात आयपीएल संघाचेही श्रेय आहे. कारण ते खेळत असो वा नसो, संघासोबत असताना हे सहायक आत्मविश्वास वाढवत असतात, असे बुमरा म्हणाला.
आज दुसरा सामना
पावसाचा व्यत्यय आला नसता, तर भारताला पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवता आला असता; पण पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारत अवघ्या दोन धावांनी पुढे होता. म्हणून डकवर्थ लुईस नियमामुळे भारताला विजय मिळवता आला. आता मालिकेतील दुसरा सामना रविवारी (ता.२०) होत आहे. त्यामुळे मालिका उद्याच जिंकण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल; परंतु हवामानाचा आणि पावसाचा अंदाज घेऊन त्यानुसार बदल करत राहावे लागणार आहे.