18.4 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

नरवीर तानाजींची शौर्यकथा उलगडणारा ‘सुभेदार’

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत – वाचत महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती लहानाची मोठी झाली आहे. परकीय सत्तेसमोर निर्भीडपणे उभे राहून स्वराज निर्माण करण्याचे स्वप्न शिवाजी महाराजांनी पहिले.

- Advertisement -

हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोंडाजी र्फजद, बाजी प्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे यांसारख्या अनेक वीर मावळय़ांनी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत शिवाजी महाराजांची साथ दिली. शिवाजी महाराजांचा हा इतिहास चित्रपटरूपात प्रेक्षकांना दाखवण्याचा निर्धार केलेल्या दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘श्री शिवराज अष्टक’ ही चित्रपट श्रुंखला प्रदर्शित करण्याचे ठरवले. या ‘श्री शिवराज अष्टका’तील ‘र्फजद’, ‘फतेशिकस्त’, ‘शेर शिवराय’ आणि ‘पावनिखड’ हे चार चित्रपट प्रदर्शित झाले असून आता लवकरच या अष्टकातील पाचवा चित्रपट ‘सुभेदार- गड आला पण..’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटात अजय पूरकर यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसणार आहे, तर जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, शेलार मामांच्या भूमिकेत अभिनेता समीर धर्माधिकारी दिसणार आहेत. सोयराबाईंची भूमिका नूपुर दैठणकर, केसरच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे, सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत स्मिता शेवाळे आणि यशोदाबाई मालुसरे यांची भूमिका शिवानी रांगोळी हिने साकारली आहे. सिंहगडाच्या साक्षीने कलाकारांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आठवणी उलगडल्या.

‘सुभेदार- गड आला पण..’ या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, ‘सुभेदार तानाजी मालुसरे यांचे चरित्र फक्त कोंढाणा जिंकला यापुरते मर्यादित नसून त्यांच्या चरित्रातील विविध पैलू या चित्रपटातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यांचे प्रशासकीय पैलू तसेच त्यांचे कुटुंबासोबत, शिवाजी महाराजांबरोबर, आऊसाहेबांसोबत असलेले नाते या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’ या चित्रपटातील पात्रांची निवड कशाप्रकारे करण्यात आली याविषयी बोलताना, ‘आपल्याकडे शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे जे उपलब्ध ग्रंथ आहेत, त्यामध्ये या वीरांचे जसे वर्णन आहे, त्याप्रकारे मी या पात्रांची निवड करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या अभिनेत्याच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल असलेली भावनाही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या त्या भूमिकेसाठी कलाकाराची कष्ट करण्याची किती तयारी आहे, या सगळय़ाचा एक अभ्यास करून मी या पात्रांची निवड केली. विशेष म्हणजे मी ज्यांच्याकडून अभिनय शिकलो असे माझे चार महत्त्वाचे गुरू सुहास मुळय़े, श्यामराव जोशी, शाहीर दादा पासलकर आणि दत्तात्रय अंबादास मायाळू यांनीही या चित्रपटात काम केले आहे,’ असे दिग्पाल यांनी सांगितले.

सुभेदार तानाजी मालुसरेंची भूमिका साकारताना आलेले अनुभव अभिनेते अजय पूरकर यांनी सांगितले. ‘तानाजीराव हे मुळात शेतकरी असूनही त्यांना पूर्वीपासून तलवार चालवता येत होती. कारण आपली आणि आपल्या परिवाराची सुरक्षा. त्या काळातील सर्व लोकांमध्ये स्वराज्याप्रति खूप निष्ठा होती आणि फार महत्त्वाचे म्हणजे त्याग करण्याची तयारी होती. तानाजी मालुसरेंची भूमिका साकारताना मला ही त्यागवृत्ती खूप जवळून जाणवली. आपल्या मुलाचा लग्नसोहळा सोडून ते मोहिमेसाठी गेले, कारण तो किल्ला घेणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांना माहिती होते. विशेष म्हणजे तानाजी मालुसरेंची भूमिका साकारताना मी स्पष्टवक्ता झालो. उगाच खोटा आव न आणता जे आहे ते स्पष्टपणे बोलणे आणि योग्य ठिकाणी संघर्ष करणे हा एक फार महत्त्वाचा गुण मी हे पात्र हे साकारताना शिकलो’ असे अजय यांनी सांगितले.

आई कशी असते हे मी शिकले..

तर जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मनोरंजनासोबतच महाराजांबद्दल असलेली निष्ठा आम्ही या चित्रपटातून मांडत आहोत, असे सांगितले. जिजाबाईंची भूमिका साकारताना दडपण हे नक्कीच येते, असे सांगतानाच जिजाबाई ही व्यक्तिरेखा अशी आहे की त्या नसत्या तर आपण कोणीच नसतो. स्वराज्य जननी म्हणतात त्यांना. त्यांची भूमिका साकारताना एक आई कशी असावी हे मी शिकले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दिग्पालचा पाठीराखा म्हणून मी उभा आहे..

या चित्रपटाची संहिता वाचल्यावर माझ्या लक्षात आले होते, चित्रपटाचा भावनिक आवाका फार मोठा आहे. हा चित्रपट पाहून कोणताच प्रेक्षक कोरडय़ा डोळय़ांनी चित्रपटगृहाबाहेर पडू शकणार नाही. या भावना चित्रपटाच्या माध्यमातून व्यवस्थित अधोरेखित करण्यासाठी चित्रपटाचा संपूर्ण चमू गेले वर्षभर मेहनत घेत आहे. हा चित्रपट म्हणजे अभ्यास आणि प्रयत्नांनी हळूहळू घडत गेलेली प्रक्रिया आहे, असे अभिनेता चिन्मय मांडलेकर याने सांगितले. ‘र्फजद’च्या निमित्ताने मी दिग्पालसोबत शिवाजी महाराजांबद्दल बोलू लागलो आणि त्यावेळी मला लक्षात आलं आपल्या पाठयपुस्तकातून फार कमी शिवकालीन इतिहास शिकवला जातो. दिग्पालकडून शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक गोष्टी मला समजल्या. या सहा वर्षांत महाराजांच्या अनेक कथा मी समजू शकलो आणि त्यानुसार मी महाराजांचे पात्र साकारताना मेहनत घेत होतो. या चित्रपटाची निर्मिती करताना अनेक आव्हानं समोर आली, पण मी या चित्रपटासाठी एका निर्मात्यापेक्षा दिग्पालचा पाठीराखा म्हणून उभा आहे, अशा शब्दांत या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनय आणि निर्मिती अशी दुहेरी जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या चिन्मयने आपल्या भावना व्यक्त केल्या. १८ ऑगस्टला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होतो आहे. १८ ऑगस्टला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होतो आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles