हवाहवाई! पुणेकरांसाठी हवेत उडणारी बस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

0
82
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

‘वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी पुण्यात 50 हजार कोटींचे पूल उभारण्यात येतील. तसेच पुणे-बंगळुरू आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येतील,’ अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

दरम्यान, पुणे शहरात आता रस्तेरुंदीकरण करणे अवघड आहे. त्यामुळे पुण्यात हवेत उडणारी ‘स्कायबस’ आणणे आवश्यक असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने तर्क-वितर्क व चर्चांना उधाण आले होते.

गडकरी म्हणाले, ‘येणाऱया काळात पुणे हे देशाच्या विकासाचे केंद्र होणार आहे. पुणे अनेकांना रोजगार देणार आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहरही पुणेच आहे. 24 तास पाणी आणि उत्तम रस्ते आवश्यक आहेत. पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी 50 हजार कोटींचे पूल हे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील. तसेच पुणे-बंगळुरू, पुणे-छत्रपती संभाजीनगर हे रस्ते प्रकल्पही पूर्ण करू.’

– चांदणी चौक प्रकल्पासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मोठय़ा प्रकल्पांवरील खर्च आणि वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आकश्यक आहे. पुण्यातील ऑटोरिक्षांना नवे परवाने देताना इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणाऱया रिक्षांना परवाने दिल्यास प्रदूषण कमी होईल, असे गडकरी म्हणाले.

अजित पवार म्हणाले, ‘या पुलाने कोणालाच सोडले नाही. थोडय़ाफार प्रमाणात या पुलाचा त्रास सर्वांनाच झाला. मुख्यमंत्रीदेखील एकदा वाहतूककोंडीत अडकले होते. आणि त्यामुळे त्यांनीपण लगेच बैठक घेतली होती.

– ‘आता पुण्यातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊ शकणार नाही. प्रचंड गर्दी आणि वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे पुण्यात काही ठिकाणी हवेत उडणारी ‘स्कायबस’ आणण्याचा प्रयत्न असणार आहे. या स्कायबसमधून एका वेळेस 250 प्रवासी प्रवास करू शकतात. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी स्कायबसची मांडणी एकदा पाहावी आणि त्याचा अभ्यास करावा,’ अशा सूचना नितीन गडकरी यांनी केल्या.

पुणे विभागात पावणेदोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले असून, त्यांतील काही पूर्ण झाले आहेत. 12 हजार कोटींचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीमार्ग डिसेंबरअखेर पूर्ण होतील,’ असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here