पालिकेच्या परळ येथील ‘केईएम’ रुग्णालयात डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे एका 52 दिवसांच्या बाळाचा हात कापावा लागल्याचा आरोप बाळाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत चार डॉक्टरांची चौकशी समिती नेमण्यात आल्याचे आज अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. हरीश पाठक, प्रोफेसर डॉ. मोहन देसाई, पिडियाट्रिक विभागाचे प्रमुख डॉ सुनील कारंडे व औषध विभागाच्या प्रोफेसर डॉ.अंजली राजाध्यक्ष यांचा या समितीत समावेश आहे. या समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.