माहेरच्या मंडळींनी पेटवून दिले सासरच्याचे घर

0
198
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पाथर्डी – मायलेकराने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळींनी अक्षरशः सासरच्या लोकांचे रहाते घरच पेटवून दिले. तालुक्‍यातील तिसगावमध्ये आज दुपारी हा प्रकार घडला.

रात्री उशीरापर्यंत मायलेकराच्या मृत्यदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. हे अंत्यसंस्कार माहेरी की सासरी करावयाचे याबाबत वाद सुरू होता.

दरम्यान, या घटनेमुळे तिसगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तालुक्‍यातील तिसगाव येथे मनीषा संदीप नरवडे (वय 35) व ओमकार संदीप नरवडे (वय 10) जो सध्या गारुडकर वस्ती येथील इयत्ता चौथी शिक्षण घेत होता. अशा या मायलेकराने शेतातील विहिरीत मंगळवारी उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आला.

विहिरीत मृतदेह असल्याचे समजताच तिसगाव ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या दोघांचे मृतदेह बुधवारी दुपारनंतर विहिरीतून बाहेर काढले व दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी मयत महिलेचे माहेर असलेल्या खुंटेफळ तालुका शेवगाव येथील नातेवाईक मंडळी तिसगावमध्ये आल्यानंतर सासरच्या नरवडे कुटुंबाचे राहते घर पेटवून देत संताप व्यक्त केल्याची घटना घडली आहे.

नरवडे कुटुंबाचे घर पेटल्याची माहिती समजल्यानंतर गावातील सरपंच इलियास शेख, बाळासाहेब लवांडे, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर, माजी सरपंच काकासाहेब शिंदे, भारत गारुडकर, आनंद लवांडे, उदय लवांडे, सतीश साळवे, वैभव वाघ या तरुणांसह इतरही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करून पेटलेले घर दुपारी एकच्या सुमारास विजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील तरुणांनी पेटलेल्या घराजवळ बांधलेली गाई, म्हैस, बैल, शेळ्यांना इतरत्र सुरक्षितस्थळी बांधून त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.

मयत मनीषा नरवडे व संदीप नरवडे यांच्या अंत्यसंस्कार नरवडे यांच्या राहत्या घराजवळ करायचा का की गावातील स्मशानभूमीत या भावनिक विषयामुळे त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आलेले नव्हते. सासरचे आणि माहेरचे दोन्ही कुटुंबाचे लोक या घटनेनंतर समोरासमोर आल्याने तिसगावमध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला होता, परंतु घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस या संपुर्ण घटनेवर लक्ष ठेऊन होते. तिसगावमध्ये मायलेकराने केलेल्या आत्महत्यामुळे तिसगावसह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here