RBI Repo Rate : मुसळधार पावसासह महागाईचा RBI वर दबाव, व्याजदर वाढतील का?

0
82
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

वी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या एका वर्षात महागाई कमी करण्यासाठी कंबर कसली. व्याजदराच्या मदतीने त्यांनी महागाईला वेसण घातले. महागाईने (Inflation) जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या नाकीनऊ आणले.

पण भारतात वेगळंच चित्र आहे. महागाईला लगाम घालण्यात आरबीआयला यश आल्याचे दिसून आले होते. पण अवकाळी आणि मुसळधार पावसाने हे गणित बिघडवले. भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर घटकांचे भाव पुन्हा आकाशाला भिडले. दोनदा रेपो दरात वाढ न करुन भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्वांनाच धक्का दिला होता. आता महागाईने दोन महिन्यात नवीन रेकॉर्ड केला आहे. सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. जगातील सर्वच बँकांनी व्याजदरात (Repo Rate) वाढ केली आहे. इतका दबाव असल्याने RBI च्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

महागाईने घेतला धसका

 

एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई 18 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर म्हणजे 4.70 टक्क्यांपर्यंत घसरली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) याविषयीचे आकडे जाहीर केले होते. मार्च महिन्यात हा दर 5.66 टक्के होता. ग्राहक खाद्य किंमत निर्देशांक (CFPI) एप्रिल महिन्यात घसरुन 3.84 टक्क्यांवर आला. मार्च महिन्यात हा निर्देंशांक 4.79 टक्के होता. एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात 4.68 टक्के आणि शहरी भागात 4.85 टक्के होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर 4.25 टक्क्यांवर आला होता.

 

महागाईने दिली मात

 

हिंदुस्थान वृत्तपत्रातील बातमीनुसार, मे महिन्यापेक्षा जुलै महिन्यात किंमती अधिक वधारल्या. जून ते जुलै या काळात टोमॅटोच्या किंमतीत 363.8 टक्के उसळी आली. तर कांद्याने पण महागाईला आवताण दिले. काद्यांच्या किंमती 20.7 टक्के वाढल्या. बटाट्यांच्या किंमती अजून जास्त वाढलेल्या नाहीत. तरीही मे महिन्यापासून यामध्ये 15.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.

 

दरवाढीचा आलेख

 

पावसाळा सुरु होताच जून ते जुलै महिन्याच्या दरम्यान तूरडाळीच्या किंमतींनी 12.5 टक्क्यांची उसळी घेतली. उडदाची डाळ 3.9 टक्क्यांनी महागली.तांदळाने दरवाढीचा नवीन रेकॉर्ड केला आहे. तांदळाच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ झाली. गुरुवारी तांदळाची सरासरी किंमत 41 रुपये प्रति किलोग्रॅमवर झाली. गेल्यावर्षी हा भाव 37 रुपये होता. गव्हाची महागाई 2.96 टक्क्यांहून 4.49 टक्क्यांवर पोहचला आहे. गव्हाच्या किंमती वधारल्याने महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

व्याजदरात मोठी वाढ

 

व्याज दरात वाढ करण्याची सुरुवात गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला. एप्रिल आणि त्यानंतर जूनमध्ये रेपो दरात वाढ झाली नाही.

 

व्याजदरात केली वाढ

 

जगातील अनेक केंद्रीय बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेने 26 जुलै रोजी व्याज दरात वाढ केली. व्याज दर 5.25 टक्क्यांवर पोहचला. महागाईला चाप लावण्यासाठी गेल्या 18 महिन्यापासून व्याज दरात वाढ होत आहे. 3 ऑगस्ट रोजी बँक ऑफ इंग्लडने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी 14 वी दरवाढ केली आहे.

 

आरबीआयची परीक्षा

 

आज 10 ऑगस्ट रोजी आरबीआयची पतधोरण समिती रेपो दराविषयीची भूमिका जाहीर करेल. पण सध्या आरबीआयवर मोठा दबाव आहे. महागाई रोखण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे काही तज्ज्ञ आरबीआय रेपो रेटमध्ये कुठलीच वाढ करणार नाही, असा अंदाज वर्तवित आहेत. हे चित्र आज स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here