धुळे जिल्ह्याची माहिती

0
68
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पूर्वीचा पश्चिम खानदेश म्हणजे आजचा धुळे जिल्हा होय. सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची पर्वत रांग पोहोचलेली आहे. याशिवाय गाळणा डोंगराच्या टेकड्या आहेत. तापी, पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. धुळे जिल्ह्याचे 1 जुलै 1998 रोजी विभाजन होवून नंदुरबार हा जिल्हा अस्तित्वात आला. धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर या चार तालुक्यांचा समावेश आहे. धुळे व शिरपूर हे प्रशासकीय उपविभाग आहेत.

धुळे जिल्ह्यातून मुंबई- आग्रा, नागपूर- सुरत, धुळे- सोलापूर हे राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळे- चाळीसगावदरम्यान रेल्वे सेवा आहे, तर भुसावळ- सुरत हा लोहमार्ग धुळे जिल्ह्यातून जातो. धुळे शहरापासून जवळ असलेल्या अवधान, नरडाणा, ता. शिंदखेडा येथे औद्योगिक वसाहत आहे. गोंदूर, ता. जि. धुळे व शिरपूर येथे विमानतळ आहे.

धुळे जिल्ह्यात कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पश्चिमपट्ट्यात भात पीक घेतले जाते. रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके घेतली जातात. याशिवाय ऊस, केळी, मिरची, कापूस ही नगदी पिके घेतली जातात. जिल्ह्यात गुढीपाडा, अक्षयतृतीया, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आदी सण उत्साहात साजरे केले जातात.

धुळे जिल्ह्यात सुमारे 376 `क` वर्गीय पर्यटनस्थळे आहेत. लळिंग, सोनगीर, ता. धुळे, भामेर, ता. साक्री, थाळनेर, ता. शिरपूर येथे डोंगरी व भुईकोट ऐतिहासिक किल्ले आहेत. लळिंग किल्ल्याशिवाय लळिंग कुरण येथे धबधबा असून येथे पावसाळ्यात पर्यटकांची नित्य वर्दळ असते. साक्री तालुक्यातील आमळी येथील अलालदरीचा धबधबाही प्रसिध्द आहे. धुळे येथे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वस्तूसंग्रहालय आहे. या वस्तूसंग्रहालयात अनेक ऐतिहासिक, दुर्मिक वस्तू पाहावयास मिळतात. तसेच सत्कार्योत्तेजक सभेचे श्री वाग्देवता मंदिर आहे. येथे समर्थ रामदास स्वामींचे साहित्य जतन करण्यात आले आहे.

अनेर धरण अभयारण्य परिसर, नागेश्वर, ता. शिरपूर परिसरही पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. शिरपूर तालुक्यात अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ अनेर अभयारण्य आहे. 83 चौ. कि. मी. क्षेत्रात अनेर अभयारण्य आहे. या अभयारण्यात कोल्हा, भेकर, लांडगा, अस्वल, रानडुकर, तडस, ससा या वन्यप्राण्यांसह तितर, बटेर, गिधाड, सुतारपक्षी, मैना, सायाळ, हॉर्नबिल, पाणकोंबडी, बगळे आदी पक्षी आढळून येतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here