संपादकीय – मी धारावित पहिल्यांदा गेलो तेव्हा, अदानींचा स्वानुभव त्यांच्या लेखणीतून

0
82
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

माझी.  धारावीची पहिली ओळख १९७० च्या दशकाच्या अखेरीस झाली. मी मुंबईत नवीनच होतो. हिऱ्यांच्या व्यापारात आपले नशीब अजमावून पाहण्याच्या ओढीने या शहराने मला खेचून आणले होते. त्यावेळी पहिल्यांदा धारावी पाहिली आणि अनेक धर्म, संस्कृती, भाषांचा मिलाफ घडवून आणणाऱ्या, पोटापाण्याच्या शोधात आलेल्यांना पोटाशी घेणाऱ्या तिथल्या औद्योगिक कोलाहलाने मंत्रमुग्ध झालो.धारावीच्या गल्ल्यांमधून भारतात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक भाषेचे प्रतिध्वनी सारख्याच तीव्रतेने ऐकू येत असत; पण या साऱ्या कोलाहलाही स्वतःची अशी एक लय होती. धारावीने मला अस्वस्थ केले होते, नक्की! तिथल्या लोकांचा रोजचा जगण्याचा संघर्ष पाहताना मला वाटे, कधीतरी इथल्या लोकांची परिस्थिती बदलेल का?

 

– आजही या प्रश्नाने माझी पाठ सोडलेली नाही. मुंबई विमानतळावर विमान उतरताना खाली पसरलेली धारावी मानवी गोधडीसारखी दिसते. भिन्न पार्श्वभूमीच्या स्थलांतरितांना अगदी सहजपणे सामावून घेण्याची मुंबईची क्षमता खरेच अचाट आहे : धारावी हे त्या क्षमतेचे प्रत्यक्ष रूप!

या पार्श्वभूमीवर जेव्हा धारावीच्या पुनरुज्जीवनाची संधी चालून आली, त्यावेळी साहजिकच मी ती दोन्ही हातांनी घट्ट पकडली. या पुनर्वसन प्रकल्पासाठी अतिउत्साहात आम्ही जी बोली लावली, ती दुसऱ्या बोलीपेक्षा तब्बल अडीच पट अधिक होती. कदाचित या साऱ्याचा संबंध मुंबईच्या पहिल्या दर्शनाने माझ्यावर जो अमीट ठसा उमटवला, त्याच्याशी असावा!

 

आजवरच्या इतिहासात कोणीच हाती घेतलेला नाही, अशा आकाराच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाला आम्ही प्रारंभ करतो आहोत. या प्रवासातील पर्वताएवढ्या आव्हानांची मला कल्पना आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्प तीन कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे : हा जगातील सर्वांत मोठा शहरी पुनर्वसन आणि पुनरुत्थानचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत जवळपास दहा लाख लोकांचे पुनर्वसन होणार आहे. रहिवाशांबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातील, विभिन्न आकाराच्या औद्योगिक आणि व्यापारी संस्थांच्या पुनर्वसनाचाही यात समावेश आहे. पात्र आणि अपात्र अशा सर्वच गाळेधारकांचे समग्र आणि सर्वसमावेशक पुनर्वसन या प्रकल्पात करण्यात येणार आहे.

 

आज माझ्याकडे आहे ती धारावीकरांचे आयुष्य बदलण्याची सदिच्छा आणि हा प्रकल्प यशस्वी करण्याचा दृढ निश्चय. धारावीचे पुनर्निर्माण हे मानवी चेहऱ्याचे असेल. जास्तीत जास्त लोकांच्या मतांचा समावेश पुनर्विकास धोरणात केला जाईल. फक्त धारावीतले रहिवासीच नव्हे, तर अशा स्वरूपाच्या कामातली तज्ज्ञता असलेल्या, या प्रकल्पाबाबत आस्था असलेल्या प्रत्येक मुंबईकराशी सल्लामसलत करायला आम्ही तयार आहोत. धारावीच्या पुनर्निर्माणात सर्वच मुंबईकरांचा सहभाग असला पाहिजे. धारावीच्या पुनर्निर्माणात मुंबईचा स्वत:चा चेहरा, तिचे चैतन्य, तिची हिंमत, तिचा निर्धार हे सारे सारे उमटले पाहिजे. आणि हे सारे करताना “धारावीचा आत्मा” हरवणार नाही, याची काळजीही घेतली पाहिजे.प्रकल्प निर्मितीच्या काळात धारावीकरांचे कुठेही विस्थापन होणार नाही. त्यांना फक्त एकदाच त्यांच्या राहत्या घरातून बाहेर पडावे लागेल ते म्हणजे नवीन घरात प्रवेश करण्यासाठी.

 

आपले नवीन घर कसे असावे, हे ठरविण्यात त्यांचा सहभाग असेल. गॅस, पाणी, वीज, स्वच्छता आणि सांडपाणी निर्मूलन, आरोग्य सुविधा, विरंगुळ्यासाठी सुविधा आणि मोकळ्या जागा अशा सर्व सुविधांनी ही घरे युक्त असतील. धारावीकरांना जागतिक दर्जाच्या शैक्षिणक आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. “आम्ही धारावीचे रहिवासी आहोत” हे सांगताना ऊर अभिमानाने भरून येईल, असे हे नवे चित्र असेल! सर्वांत मोठे आव्हान असेल ते इथल्या रोजगार निर्मिती केंद्रांचे पुनर्निर्माण. धारावीचा कायाकल्प एका आधुनिक उद्योग केंद्रात व्हावा, असा माझा निर्धार आहे. इथल्या सूक्ष्म आणि लघुउद्योगांचे पुनर्वसन होऊन धारावी हे नवीन युगातील रोजगाराचे केंद्र होईल. यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नागरी गट यांची मदत घेतली जाईल. कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्रे उभारली जातील. सामायिक सुविधा केंद्रांमध्ये सेवा आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रांचा समावेश असेल. तसेच संशोधन केंद्र, डेटा सेंटर (विदा केंद्र), सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग सुविधा केंद्र यांचाही समावेश असेल. ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्सवर आधारित एका संघटित आणि योजनाबद्ध बाजारपेठेचा विकास केला जाईल.

 

धारावी पुनर्विकासाच्या प्रयत्नांना जवळपास ५० वर्षांचा इतिहास आहे. यावेळच्या निविदा प्रक्रियेतील काही महत्त्वपूर्ण बदलांमुळे (अपात्र गाळेधारकांचे पुनर्वसन, रेल्वेच्या ४५ एकर जागेचा समावेश) धारावीचा विकास हा विनाविलंब सुरू होऊ शकतो. महाराष्ट्रातल्या सर्वच सरकारांचे प्रयत्न, राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आणि केंद्र सरकारची मोलाची साथ हेही महत्त्वाचे घटक! या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या हिमालयाएवढ्या मोठ्या आव्हानांची मला कल्पना आहे. त्यासाठी मी आणि माझे सहकारी अथक प्रयत्न करू!

 

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर माईक टायसन यांनी जर धारावीला पुन्हा भेट दिली, तर ती त्याला ओळखू येणार नाही हे खरे.. पण त्यांना हेही जाणवेल, की या प्रक्रियेत धारावीचा आत्मा हरवलेला नाही! डॅनी बॉयलसारख्यांना धारावीत नवे मिलेनिअर सापडतील, पण त्यांच्यामागे स्लमडॉग ही उपाधी नक्की नसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here