घरफोडी, मंदिर चोरीतील आंतरराज्यीय गुन्हेगारांची जोडी जेरबंद; एलसीबी, अंजनगाव पोलिसांची कारवाई

0
140
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

अमरावती : अंजनगाव सुर्जी येथील मंदिरातील चोरी व धनेगाव येथील घरफोडीतील आंतरराज्यीय गुन्हेगार जोडीला अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव सुर्जी पोलिसांनी १९ जुलै रोजी ही यशस्वी कारवाई केली.

सलीम ऊर्फ गोकुल राजु उईके (५१) व सलीम ऊर्फ सल्लू भुरे खान नुर खान पठाण (४७, दोघेही रा. बैतुल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

१८ जुलै रोजी रात्रीदरम्यान सावकारपुरा, अजंनगांव येथील जैन मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी मंदिरातील दानपेटीमधील ६ हजार रुपये रोख, पारसनाथ स्वामीच्या मुर्तीवरील चांदीचे छत्र चोरून नेले. तर त्याच रात्री धनेगांव येथील सुनिल येवले यांच्या घरातून १ लाख २६ हजार ८०० रुपये रोख व सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकुण १ लाख ६१ हजारांचा माल चोरून नेला होता. अंजनगाव पोलिसांनी दोन्ही घटनेप्रकरणी गुन्हे नोंदविले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी त्या घटनांचा उलगडा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव पोलिसांचे संयुक्त पथक गठित केले होते.

१.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त
त्या पथकाने दोन्ही गुन्हयांची कार्यपध्दती, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास आरंभला. घटनेच्या दिवशी बैतूल येथील सल्लु भुरे खान व गोकुल उईके हे अंजनगावत फिरत होते, अशी माहिती पथकाला मिळाली. त्यामुळे पथकाने त्वरेने बैतूल गाठत त्या दोघांना शिताफीने अटक केली. त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून ४३ हजार ५७० रुपये रोख, गुन्हयात वापरलेली दुचाकी, लोखंडी टॉमी असा एकूण १ लाख २३ हजार ६७०/- रूपयांचा माल जप्त करण्यात आला. यातील सलीम ऊर्फ सल्लु भुरे खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द अमरावती शहर व ग्रामीणमध्ये गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात अंजनगावचे ठाणेदार दिपक वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक संजय शिंदे, अंमलदार त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, विजय शेवतकर, सैय्यद अजमत, निलेश डांगोरे, सचिन मिश्रा, जयसिंग चव्हाण, विशाल थोरात, शुभम मार्कंड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here