क्षेत्रफळाने आशियाच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड. बेटांसह क्षेत्रफळ ३,०२,७७,१३५ चौ. किमी. उत्तरेस केप ब्लँक (३७०२१’उ.) ते दक्षिणेस केप अगुल्हास (३४०५१’ द.) दक्षिणोत्तर लांबी सु. ८,००० किमी.; पश्चिमेस केप व्हर्द (१७०३२’ प.) ते पूर्वेस केप गार्डाफुई (५१०२५’). पूर्वपश्चिम विस्तार सु. ७,४०० किमी. किनारा सु. ३६,८८८ किमी. या खंडातून विषुववृत्त, कर्कवृत्त व मकरवृत्त ही तीनही वृत्ते जातात. विषुववृत्त हे जवळजवळ मध्यातून जात असले, तरी या खंडाचा सु. दोन तृतीयांश भाग त्याच्या उत्तरेस आहे व सु. पाच षष्ठांश भाग उष्णकटिबंधात आहे. उत्तरेस जिब्राल्टरच्या चिंचोळ्या सामुद्रधुनीने ते यूरोप खंडापासून अलग झालेले असून ईशान्येस सिनाईच्या द्वीपकल्पाने ते आशियाशी जोडले गेले आहे. याच्या उत्तरेस भूमध्य समुद्र, पश्चिमेस अटलांटिक महासागर व पूर्वेस तांबडा समुद्र व अरबी समुद्र यांसह हिंदी महासागर असून, दक्षिणेस २०० पू. रेखावृत्त ही अटलांटिक व हिंदी महासागर यांमधील सीमा मानली जाते.
आफ्रिकेच्या उत्तरेचा भूमध्यसागरतटावरील प्रदेश यूरोपीयांना दीर्घकाळपर्यंत माहीत होता; परंतु बाकीच्या बऱ्याच भागाशी पाश्चात्त्यांचा संबंध अगदी अलीकडचा आहे. येथील हिरे, सोने, तांबे, कोबाल्ट वगैरे मौल्यवान खनिजे व कापूस, कोको, पामबिया, पामतेल, शिसल, भुईमूग इ. कच्चा माल, येथील अरण्यांत मिळणारे लाकूड, येथील विविध प्राण्यांची शिकार व त्यांपासून मिळणारे हस्तिदंत, कातडी वगैरे किंमती पदार्थ यांमुळे या खंडातील शक्य तेवढा प्रदेश आपल्या अमलाखाली आणण्याची यूरोपीय राष्ट्रांची एकोणिसाव्या शतकात मोठीच स्पर्धा लागली. मुळचे लोक मागासलेले असल्यामुळे त्यांना बाजूला सारून आपले वर्चस्व स्थापणे यूरोपीयांना सुलभ झाले.दुसऱ्या महायुद्धानंतर पुष्कळशी स्वतंत्र आफ्रिकी राष्ट्रे अस्तित्वात आली. या नवोदित राष्ट्रांचे स्थिरपद होण्याचे व विकासाचे प्रयत्न व त्यांच्यापुढील समस्या, त्यांच्याकडून शक्य तेवढ्या सवलती व लाभ मिळविण्याचे पुढारलेल्या राष्ट्रांचे प्रयत्न, तेथे आपलीच हुकमत कायम ठेवण्याचा पोर्तुगालसारख्या देशांचा अट्टाहास आणि वर्णभेदावर आधारलेले दक्षिण आफ्रिका वा र्होडेशिया यांचे शासकीय धोरण यांमुळे या खंडाकडे लक्ष वेधले जात आहे. संयुक्त राष्ट्रांत आफ्रिकी राष्ट्रांच्या गटाचे सामर्थ्य जाणवू लागले आहे.