“महाराष्ट्रात विरोधकांचे नेतृत्व ‘हा’ पक्ष करेल” पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टचं सांगितलं

0
162
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नवी दिल्ली -महाराष्ट्रात विरोधी पक्षांची महाविकास आघाडी अबाधित राहील. महाराष्ट्रात विरोधकांचे नेतृत्व कॉंग्रेस करेल, अशी भूमिका त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडत्यामुळे बदललेल्या राजकीय स्थितीत महाविकास आघाडीत मोठा भाऊ बनण्यास कॉंग्रेस सरसावल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्रात मागील वर्षभरात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. आधी शिवसेनेत आणि अलिकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली. त्यामुळे कॉंग्रेस महाविकास आघाडीतील सर्वांत मोठा घटक पक्ष ठरला आहे. त्यातून कॉंग्रेस प्रमुख विरोधी पक्ष बनेल. त्याशिवाय, आमच्या पक्षातील नेता विरोधी पक्षनेता बनू शकेल, असे चव्हाण पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले. शिवसेना, राष्ट्रवादीसारखी फूट कॉंग्रेसमध्ये पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मित्रपक्षांमध्ये फूट पडल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ घटल्याचे चव्हाण यांनी मान्य केले. त्याचवेळी आमचे पक्ष मोठे आहेत. आम्हाला जनतेचा मोठा पाठिंबा आहे, असे त्यांनी नमूद केले. दिल्लीत नुकतीच कॉंग्रेस श्रेष्ठी आणि पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीतून कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा भाग बनून लोकसभा निवडणुकीला सामोरा जाणार असल्याचे स्पष्ट झाले. जागावाटप नंतर केले जाईल. खरेतर, जागावाटपासाठीची प्रक्रिया आम्ही सुरू केली होती. पण, राष्ट्रवादीमधील फुटीमुळे नव्याने सुरूवात करावी लागेल. आणखी चार ते पाच लहान पक्षांना आम्ही साथ देण्याचे आवाहन करू, असे त्यांनी म्हटले.

देश पातळीवर एकवटण्यासाठी विरोधकांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांविषयीही त्यांनी भाष्य केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांनी विरोधी पक्षांना एकत्र केले. त्या आघाडीचे नेतृत्व कोण करणार यावरून कुठला वाद झाला नाही. त्याच धर्तीवर आता विरोधकांची आघाडी आकारास येत आहे. देशभरात भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मागील लोकसभा निवडणुकीत (वर्ष 2019) भाजपला देशभरातून 37 टक्के मतं मिळाली. त्याचाच अर्थ भाजपच्या विरोधात 63 टक्के मतं गेली. मात्र, ती मतं लोकसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या 38 पक्षांमध्ये विभागली गेली. त्या मतविभाजनाचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला. आगामी निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

राष्ट्रवादीविषयी अद्याप चित्र स्पष्ट नाही!
राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिशी दोन-तृतीयांश आमदार आहेत का, ते समजू शकलेले नाही. तेवढ्या प्रमाणात पाठिंबा नसेल तर मंत्रिपदांची शपथ घेणारे राष्ट्रवादीचे नऊ आमदार अपात्र ठरू शकतात. त्या पक्षाच्या अनेक आमदारांनी कुठल्या गटाचा भाग बनायचे याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. आपल्या मतदारसंघांमधील जनतेला विश्‍वासघाताची कृती रूचलेली नसल्याची जाणीव आमदारांना होत आहे. त्यातून काही आमदार पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे जात आहेत, असा दावाही चव्हाण यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here