कादंबरीकार वि. स. खांडेकर यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती

0
61
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.वि. स. खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म ११ जानेवारी १८९८ रोजी सांगली येथे झाला. त्यांना शाळेपासून अभिनय करण्याची आवड होती. कुमारवयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्चात्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला. ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली.

सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या.

शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा-कादंबर्‍यांतून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे. हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची क्रौंचवध (१९४२) ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती(१९५९), अमृतवेल (१९६७) या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबर्‍या होत. ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.

वि. स.खांडेकर म्हटले की त्यांची ‘ययाति’  ही कादंबरी सर्वांच्या डोळ्यासमोर येते. ययाति मधील भाषा आणि त्याची सहजता लक्षात येते. काही ठिकाणी तर अर्धा ते पाऊण पान एकच वाक्य दिसते. त्याची लिहिण्याची ही जबरदस्त शैली पाहून वाचक अवाक होतो. त्याचे मूळ कारण म्हणजे त्यांच्याकडे असणारी जबरदस्त ‘प्रतिभाशक्ती’. त्याच्यावर अनेकजण टीका करतात. पण नीट विचार केला तर आमचे काही लेखक ‘आत्मचरित्रातच’ संपतात. त्याचे एक महत्वाचे कारण शब्दसंपत्ती आणि प्रतिभाशक्तीचा अभाव. परंतु खांडेकरांकडे दोन्ही गोष्टी भरपूर होत्या.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक

ययाती कादंबरीला ज्ञानपीठं पुरस्कार मिळाला. खांडेकर यांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा अनेकांची नाके मुरडली, अर्थात तो वादाचा मुद्दा झाला होता, असो. त्यानी कांचनमृग, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, अमृतवेल, क्रौचवध, ययाती, एक पानाची कहाणी, हृदयाची हाक, जळलेला मोहोर, पांढरे ढग अश्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या.

त्यांच्या काही कथा – कादंबऱ्यांवर चित्रपट झाले आहेत, दूरदर्शन मालिकाही झाल्या आहेत. १९३६ साली छाया चित्रपट मराठीत झाला, १९३८ साली ज्वाला हा हिंदी आणि मराठी चित्रपट झाला. त्याचप्रमाणे अमृत चित्रपट १९४१ साली हिंदी आणि मराठीत झाला. तर १९४१ साली धर्मपत्नी हा चित्रपट तामीळ आणि तेलगू मध्ये झाला. तसाच परदेशी, देवता हे चित्रपट त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर झाले आहेत. १९४० साली मराठी मध्ये ‘लग्न पहावे करून’ या चित्रपटात त्यांनी संवाद आणि पटकथाही लिहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here